भारत, अर्मेनियाचे प्रत्येकी 5 गुण, रशिया आघाडीवर
वृत्तसंस्था/ सित्गेस, स्पेन
फिडेच्या विश्व सांघिक महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये गट अ मध्ये सलग दोन विजयानंतर चौथ्या फेरीत भारताला बलाढय़ रशियाकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. भारताने याआधीच उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्रता मिळविली असून पाचवी व शेवटची प्राथमिक लढत फ्रान्सविरुद्ध होणार आहे.
रशियाविरुद्धच्या लढतीत भारताची अव्वल खेळाडू द्रोणावली हरिकाने अलेक्सांड्रा गोरयाचकिनाला बरोबरीत रोखल्यानंतर मेरी ऍन गोम्सनेही पोलिना शुवालोव्हाविरुद्धचा सामनाही अनिर्णीत राखला. मात्र तानिया सचदेव व आर. वैशाली पराभूत झाल्यामुळे भारताला 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी तिसऱया फेरीत भारतीय महिलांनी अर्मेनियाचा 2.5-1.5 असा पराभव केला होता. या लढतीत तानिया सचदेव व गोव्याच्या भक्ती कुलकर्णीने मिळविलेले विजय भारतासाठी निर्णायक ठरले. हरिका व एलिना डॅनिलियन यांचा डाव अनिर्णीत राहिला तर युवा आर. वैशाली लिलिट मक्रतचियानकडून पराभूत झाली. चार फेऱयानंतर भारत व अर्मेनिया यांचे प्रत्येकी 5 गुण झाले असून रशिया 8 गुणांसह त्यांच्या पुढे आहे. भारताने पहिल्या फेरीत अझरबैजानला 2-2 असे बरोबरीत रोखल्यानंतर दुसऱया फेरीत यजमान स्पेनवर 2.5-1.5 अशी मात केली होती.