ऑनलाईन टीम/तरुण भारत
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे ढग अजून गडद होत असताना रशियाने यात आणखीन भर घातली आहे. रशियाने युक्रेन विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनमधील दोन प्रांताना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे हा वाद आणखीन चिघळण्याची चिन्हे आहेत. युक्रेन विरोधात युद्धाची भाषा करणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. जनतेला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून यामुळे तणाव आणखी वाढण्याची भीती आहे. रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पुतीन यांनी लुहान्स आणि डोनेस्क हे दोन प्रांत बंडखोरांच्या ताब्यात असून त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. रशियाने या दोन्ही प्रांतांमध्ये सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे. पूर्व युक्रेनमधील रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरतावादी भागांच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याबाबत विचार करण्यासाठी व्लादिमिर पुतीन यांनी सोमवारी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पाचारण केलं होतं.