मॉस्को
कोरोनावरील उपचारात उपयुक्त ठरणाऱया आणखी एका औषधाला रशियाने मंजुरी दिली आहे. या आठवडय़ात किंवा पुढच्या आठवडय़ात हे औषध बाजारात उपलब्ध होणार आहे. अविफॅव्हिरनंतर रशियाचे हे दुसरे औषध आहे. योग्य सल्ला घेतल्यानंतर ते रुग्णाला दिले जाणार आहे. जपानमध्ये संसर्गावरील उपचाराकरिता दिल्या जाणाऱया फॅव्हिपिरावीरवर रशियाचे हे नवे औषध आधारित आहे. रशियाने मागील महिन्यातच स्फुटनिक-5 कोरोनावर लस विकसित केल्याचा दावा केला आहे. या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आली असली तरी अद्याप सर्वसामान्यांवर लसीकरण सुरू झालेले नाही.
आताचे नवे औषध आर-फार्माने तयार केले असून वैद्यकीय चाचणीच्या तिसऱया टप्प्यानंतर त्याला परवानगी देण्यात आली आहे. 168 जणांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली आहे. आर-फार्माने या औषधाच्या संदर्भात अन्य औषध कंपन्यांशी अगोदरच बोलणी सुरू केली आहेत. नजिकच्या भविष्यात कोरोनावरच्या औषधांची उपलब्धता कमी होण्याची शक्यता असल्यामुळे या औषधाला लवकरात लवकर बाजारात आणणे आवश्यक असल्याचे आर-फार्मा कंपनीचे मत आहे.