अध्यक्ष पुतीन यांचेही मौन : मोबाईल बंद
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध भडकलेले असताना रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोईगू गायब झाल्याच्या वृत्ताने जगभरात खळबळ उडाली आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याचा दावा रशियाकडून करण्यात येत असला तरी ते मोबाईलही स्वीकारत नसल्याने शंका निर्माण झाली आहे.
रशियाने युक्रेनशी युद्ध पुकारल्याच्या घटनेला एक महिन्याचा कालावधी झाला आहे. या युद्धात शोईगू यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. रशियन सैन्याच्या हालचालींवर त्यांचेच लक्ष होते. अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना ते दरतासाला माहिती देत असत. मात्र गेल्या सहा दिवसांत ते कोठेही दिसलेले नाहीत. रशियातील टीव्हीवरूनही त्यांचे दर्शन होत नाही. अध्यक्ष पुतीन यांना या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता त्यांनीही मौन पाळणे पसंत केले आहे.
गंभीर आजार
युद्ध ऐनभरात आले असतानाच शोईगू यांना गंभीर आजाराने गाठल्याचे वृत्त रशियातील अजेस्तोव्ह या स्वतंत्र वृत्तसंस्थेने गुप्त सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. रशियन अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान क्रेमलिनमधूनही यासंबंधी विशेष माहिती देण्यात आलेली नाही. ते आजारी असतील तर त्यांच्यावर कोठे उपचार सुरू आहेत? यासंबंधीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यांचा एक कार्यक्रम 20 मार्च या दिवशी दाखविण्यात आला होता. तथापि तो 11 मार्चलाच रेकॉर्ड करण्यात आला होता असा दावा रशियन पत्रकारांनी केला आहे.
अध्यक्षांशी मतभेद?
शोईगू यांच्या बेपत्ता होण्याचे कारण त्यांचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी झालेले मतभेद हे असू शकते असे काही तज्ञांचे मत आहे. युक्रेनशी युद्ध किती काळ चालवायचे या संदर्भात त्यांची मते वेगळी होती. ती रशियाच्या अधिकृत भुमिकेशी मिळती जुळती नव्हती अशीही चर्चा होत आहे. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ अधिकच वाढल्याचे त्यावर आंतरराष्ट्रीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे.
अनेक सैन्याधिकाऱयांच्या बदल्या
युक्रेन युद्धात पुरेशी प्रगती निर्धारित वेळेत होत नसल्याने यापूर्वीच अध्यक्ष पुतीन यांनी सेनेच्या अनेक उच्चाधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. अनेकांना युद्धभूमीवरून हटविण्यात आले असून त्यांच्या स्थानी नव्या अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही अनुभवी अधिकाऱयांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे. सध्या स्वतः अध्यक्षच युद्धावर लक्ष ठेवत आहेत अशी चर्चा आहे.
अमेरिकेच्या कॉललाही उत्तर नाही
शोईगू यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेक अमेरिकन उच्च पदस्थ अधिकाऱयांनी गेल्या काही दिवसात केला आहे. तथापि ते अमेरिकेचे कॉलही स्वीकारत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी अमंरिकेतही त्यांच बेपत्ता होण्याबद्दल बरीच परस्पर विरोधी मते व्यक्त होत असून त्यांच्या प्रकृतीविषयी अफवाही पसरल्या आहेत.
रशियाची कोंडी
युक्रेन युद्ध अपेक्षेपेक्षा अधिक काळ चालल्याने तसेच युक्रेनचा प्रतिकारही अपेक्षेपेक्षा अधिक तीव्र होत असल्याने रशियाची कोंडी झाल्याचा दावा अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी केला आहे. 15 दिवसांत युक्रेनवर पूर्ण ताबा मिळविण्याची योजना पुतीन यांनी आखली होती. तथापि युक्रेनने गेल्या आठ वर्षांपासून या स्थितीला तोंड देण्याची तयारी चालविली होती. त्यामुळे युक्रेनची सज्जता रशियाच्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. रशियासाठी आता हा प्रतिष्ठेचा प्रश्न झाल्याने युद्ध एकतर्फी थांबवणेही रशियाला शक्य नाही. या युद्धात दोन्ही देशांची अपरिमित हानी होऊनही युद्ध सुरू आहे.
युद्धाचा भडका कायम
@एक महिन्यानंतरही युक्रेन-रशिया युद्धाची धग कायम
@लवकर युद्ध संपणार नसल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत
@पुतीन यांच्याकडून युक्रेनमध्ये अधिक सैनिकांची नियुक्ती
@शस्त्रबळात वरचढ असूनही रशियाची प्रगती मंदगतीने