रशियाने युद्ध थांबवावे, यासाठी आता पाश्चिमात्य देशांनी अधिक दबाव वाढविण्यास प्रारंभ केला आहे. रशियाच्या कोळशावर बंदी घालण्यात आली आहे. पश्चिम युरोपातील देश वीजनिर्मितीसाठी मोठय़ा प्रमाणावर रशियन कोळशाची आयात करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांनी कोळसा आधारित वीजेचे उत्पादन कमी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सध्याचे युद्ध ही त्यांच्यासाठी कोळशाचा उपयोग आणखी कमी करण्याची संधी असल्याचे मानले जात आहे.
रशियाला या निर्णयाचा अर्थिक फटका मोठय़ा प्रमाणात बसू शकतो. रशियाचे उत्पन्न प्रामुख्याने खनिज संपत्तीच्या निर्यातीतून गोळा होत आहे. पण युद्धामुळे रशियाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर निर्बंध आल्याने त्या देशाची अर्थव्यवस्था कमजोर होण्याची शक्यता आहे. रशियाच्या ऊर्जास्रोतांवर अमेरिकेनेही बंधने आणली आहेत. रशिया हा जगातील तिसऱया क्रमांकाचा कोळसा निर्यात करणारा देश आहे. गेल्या आठवडय़ाभरात रशियाच्या अनेक आर्थिक व्यवहारांवर निर्बंध लादल्यामुळे रशियाला एकटे पाडण्याच्या प्रयत्नात यश आले आहे, असा दावा पाश्चिमात्य देशांकडून केला जातो. मात्र, युद्ध थांबल्यासच या उपायांचा प्रभावीपणा सिद्ध होणार आहे, असे काही अभ्यासकांचे मत आहे.