वृत्तसंस्था/ व्हिएन्ना
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या अर्स्ट बँक खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत रशियाच्या आठव्या मानांकित आंदे रूबलेव्हने एकेरीत विजयी सलामी देताना स्लोव्हाकियाच्या गोम्बॉसचा पराभव केला.
सोमवारी झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यात रूबलेव्हने गोम्बॉसचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करताना 11 बिनतोड सर्व्हीसची नोंद केली. 2020 च्या टेनिस हंगामात रूबलेव्हने एटीपी टूरवरील चार स्पर्धा आतापर्यंत जिंकल्या असून आता तो पाचवी स्पर्धा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सर्बियाच्या जोकोव्हिचने या वर्षीच्या टेनिस हंगामात चार स्पर्धा जिंकल्या आहेत. व्हिएन्नातील या स्पर्धेत जोकोव्हिच आणि क्रेजोनोव्हिक यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. रूबलेव्हने यापूर्वी हॅम्बुर्ग आणि सेंट पीटर्सबर्ग स्पर्धा जिंकल्या आहेत.
पहिल्या फेरीतील दुसऱया एका सामन्यात सर्बियाच्या कोरिकने अमेरिकेच्या फ्रिझचा 6-4, 6-4 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. ऑस्ट्रीयाच्या रोडीनोव्हने शेपोव्हॅलोव्हचा 6-4, 7-5, दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसनने ऑस्ट्रीयाच्या नोव्हिकचा 6-7 (2-7), 6-4, 7-6 (8-6), बुस्टाने मोनफिल्सचा 6-1, 2-0 असा पराभव केला. दुखापतीमुळे मोनफिल्सने दुसरा सेट चालू असताना स्पर्धेतून माघार घेतली. या स्पर्धेवेळी कोरोना नियमानुसार केवळ 1000 प्रेक्षकांना सामने पाहण्याची परवानगी देण्यात आली होती.