17 वर्षीय मुलीवर बलात्कार, नंतर निर्दयी हत्या
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियाचे सैन्य युक्रेनच्या शहरांवर मोठय़ा प्रमाणात क्षेपणास्त्रs डागत आहे. दोन्ही देश नुकसानीवरून अनेक प्रकारचे दावे करत आहेत. याचदरम्यान एका युक्रेनियन महिलेने रशियाचे सैनिक महिलांवर बलात्कार करत असल्याचा दावा केला आहे. यापूर्वी युक्रेनचे विदेशमंत्री दिमित्री कुलेबा यांनीही रशियाच्या सैनिकांवर युक्रेनियन महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता.
खेर्सोनमध्ये राहणाऱया स्वेतलाना जोरिना यांनी शहरातील बिकट स्थिती आणि महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल जागतिक वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे. महिला आणि मुलींवर रशियाच्या सैनिकांनी बलात्कार करण्यास प्रारंभ केला आहे. 17 वर्षीय मुलीसोबत असे घडले, तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर रशियाच्या सैनिकांनी तिला मारून टाकल्याचे जोरिना यांनी म्हटले आहे.
लोक घाबरले असून स्वतःच्या घरांमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवत आहेत. आम्ही घाबरलो असलो तरीही हार मानणार नाही. रशियाच्या कब्जानंतरही खेर्सोन एक युक्रेनियन शहर असून आम्ही येथेच राहू इच्छितो. आता आम्हाला घराबाहेर पडण्यास भीती वाटत असली तरीही आम्हाला आमच्या सैन्यावर विश्वास असल्याचे त्या म्हणाल्या.