अफगाण शरणार्थींप्रकरणी पुतीन यांची वादग्रस्त टिप्पणी
तालिबानच्या अत्याचारांपासून अफगाण जनतेला वाचविण्यासाठी पूर्ण जग धडपड करत आहे. यादरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी अफगाण शरणार्थींवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रशियानजीकच्या देशांमध्ये अफगाणमधील लोकांना आश्रय देण्याचा विचार त्यांनी फेटाळला आहे. शरणार्थी म्हणून आमच्या देशात दहशतवादी शिरू नयेत अशी आमची इच्छा असल्याचे पुतीन म्हणाले.
मध्य आशियाई देशांमध्ये आश्रय नाही
पुतीन यांनी काही पाश्चिमात्य देशांमधील अफगाणिस्तानच्या शरणार्थींना शेजारील मध्य आशियाई देशांमध्ये हलविण्याच्या कल्पनेवर टीका केली आहे. याचदरम्यान अमेरिका, भारत आणि ब्रिटनने अफगाण शरणार्थींसाठी व्हिसा प्रयत्नांना वेग दिला आहे. प्रतिदिन मोठय़ा संख्येत अफगाण नागरिक अमेरिका, ब्रिटन, भारत, कॅनडा आणि अन्य देशांमध्ये आश्रयासाठी पोहोचत आहेत.
अमेरिकेच्या प्रस्तावावर टीका
पाश्चिमात्य देश अफगाणी लोकांना व्हिसाशिवाय स्वीकारू इच्छित नाही. अशा स्थितीत अफगाण शरणार्थींना आमच्या शेजारी देशांमध्ये व्हिसाशिवाय कसे पाठविले जाऊ शकते? समस्येवर तोडगा काढण्यासाठी असा अपमानास्पद दृष्टीकोन का असा सवालही पुतीन यांनी उपस्थित केला आहे.
दहशतवाद्यांची भीती
अमेरिकेच्या प्रस्तावाला रशियाचा विरोध आहे. सोव्हियत काळातील मध्य आशियाई देशांच्या रहिवाशांसाठी रशिया व्हिसामुक्त प्रवासाची अनुमती देतो. शरणार्थींच्या वेशात दहशतवादी दिसावेत अशी आमची इच्छा नाही असे पुतीन यांनी म्हटले आहे.
तालिबानचे कौतुक
तालिबानचे नेते आतापर्यंत स्वतःच्या आश्वासनांवर ठाम आहेत. तालिबानकडून संघर्ष रोखण्यासंबंधी दिलेली विधाने आम्ही पाहत आहोत. संघर्षात सामील सर्व लोकांसाठी माफीची योजना, राष्ट्रव्यापी संवादाच्या आवश्यकतेवर मत मांडले जात असल्याचा दावा रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केला आहे.