ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियात कोरोनाबाधितांच्या संख्येने 10 लाखाचा टप्पा गाठला आहे. रशियात आतापर्यंत 10 लाख 048 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 8 लाख 15 हजार 705 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
रशियात मंगळवारी 4 हजार 729 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 123 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रशियात 1 लाख 67 हजार 044 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 2 हजार 300 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 17 हजार 299 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत रशियाचा जगात चौथा क्रमांक लागतो. रशियात आतापर्यंत 3 कोटी 69 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या, ब्राझील दुसऱ्या तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 62 लाख 57 हजार 571 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ब्राझीलमध्ये 39 लाख 52 हजार 790 तर भारतात ही संख्या 37 लाख 66 हजार 108 एवढी आहे.