ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियात 16 वर्षीय तरुणाने ‘अल्ला हू अकबर’चा नारा देत एका पोलिसावर तीन वेळा चाकूहल्ला केला. त्यावेळी सहकारी पोलिसाने केलेल्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर जखमी पोलिसाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रशियातील एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
रशियाच्या कुक्मोर शहरात संबंधित तरुण स्वत:जवळ चाकू आणि पेट्रोल बॉम्ब घेऊन फिरत होता. कुक्मोर शहरात मुस्लिमांची संख्या अधिक आहे. या शहरात फ्रान्स अध्यक्षांविरोधात आंदोलन झाले होते. तेथे तैनात असलेल्या एका पोलिसांवर या तरुणाने पाठीमागून चाकूहल्ला केला. ‘अल्ला हू अकबर’ ओरडत त्याने हा चाकूहल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सहकारी पोलिसांच्या गोळीबारात आरोपी तरुणाचा मृत्यू झाला.
मृत तरुण पोलीस स्टेशनच्या इमारतीला आग लावण्यासाठी आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, गुरुवारी फ्रान्सच्या नीसमध्ये एका ट्यूनीशियाई हल्लाखोराने तीन लोकांवर हल्ल्या केला. यात तिघांचा मृत्यू झाला होता.