मानवी संस्कृती विकासाचे रहस्य उलगडणार
रशियाच्या पुरातत्व तज्ञांनी वेलेटमा नदीनजीक 10 हजार वर्षे जुनी मेसोलिथिक वस्तीचा शोध लावला आहे. या वस्त्यांची निर्मिती बुटोवो संस्कृतीच्या प्रारंभिक काळात झाली होती. इन्स्टीटय़ूट ऑफ आर्कियोलॉजी ऑफ द रशियन अकॅडमी ऑफ सायन्सच्या पथकाने या शोधाला मैलाचा दगड ठरविले आहे. या वस्तीच्या अध्ययनातून मानवी संस्कृतीच्या विकासासंबंधी मोठय़ा रहस्याचा पर्दाफाश होऊ शकतो अशी आशा वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
शिकारी होते मेसोलिथिक
पुरातत्व तज्ञांनी रशियाच्या वेलेटमा नदीनजीक मेसोलिथिक वस्तीच्या शोधाकरता उत्खन केले आहे. मेसोलिथिक लोकांना शिकारी समुदायाचा हिस्सा मानले जाते. हे लोक पश्चिम रशियाच्या वनक्षेत्राला लागून असलेल्या हिमाच्छादित भागात राहत होते. सद्यकाळात या क्षेत्रातून हिमखंडाचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. तर या भागात आढळणारे बहुतांश जुन्या काळातील मोठे जीव विलुप्त झले आहेत. या क्षेत्रात मेसोलिथिक वस्तीचे संकेत सर्वप्रथम 1970 च्या दशकात मिळाले होते.
मोठय़ा क्षेत्रात उत्खनन
उत्खनन प्रक्रियेदरम्यान पुरातत्व तज्ञांनी 10 हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रात फैलावलेल्या 5 स्थळांचे अध्ययन केले. या उत्खननादरम्यान नवपाषाण, कांस्य आणि प्रारंभिक लोहयुगानंतरच्या युगातील वस्तू सापडल्या आहेत. या स्थळांवर चमकदार दगडांच्या कलाकृती आणि मोठय़ा संख्येत प्राणी आणि माशांचे अवशेष सापडले आहेत. चमकदार दगडांचे परस्परांमध्ये घर्षण घडवून आणत आग पेटविली जात होती असा अनुमान आहे.