हजारो लोक अटकेत : युक्रेनवरील हल्ल्यामुळे वाढली नाराजी
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता विस्फोटक होत चालले आहे. दिवस उलटताच स्थिती अत्यंत बिघडत चालली आहे. रशियाकडून अद्याप हल्ले रोखण्यात आलेले नाहीत. तर युक्रेन देखील जोरदार प्रत्युत्तर देत आहे. परंतु याचदरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
स्वतःच्या देशातच टीकेचा भडिमार
जगभरातील देशांकडून रशियावर सातत्याने नवनवे निर्बंध लादले जात आहेत. परंतु पुतीन आता मायदेशातच अडचणीत येऊ लागले आहेत. अनेक वर्षांनी रशियामध्ये तीव्र निदर्शने होऊ लागली आहेत. ही निदर्शने थेटपणे पुतीन आणि त्यांच्या रणनीतिच्या विरोधात केली जात आहेत. एका सुरात युक्रेनविरोधातील हल्ल्याला विरोध करण्यात येतोय. हा विरोध देखील समाजाच्या विविध घटकांकडून होताना दिसून येत आहे. राजकीय वर्तुळातही पुतीन यांच्या विरोधात सूर उमटू लागले आहेत. अलिकडेच जागतिक बँकेतील रशियाच्या सल्लागाराने युद्धाला उघड विरोध दर्शविला होता, संयुक्त राष्ट्रसंघ हवामान परिषदेतही रशियाच्या प्रतिनिधीने पुतीन यांच्या विरोधात आवाज उठविला होता. अशा स्थितीत रशियात आता पुतीन यांच्याविरोधात लोकांचा संताप वाढत चालला आहे. जनतेचा संताप वाढू लागताच प्रशासनाची कारवाई देखील कठोर होत चालली आहे. रशियात युद्धाला विरोध करणाऱया सुमारे 7,669 निदर्शकांना अटक करण्यात आली आहे.
मोठय़ा कंपन्यांकडूनही विरोध
केवळ नागरिकच नव्हे तर आता मोठमोठय़ा कंपन्यांही स्वतःचा आवाज उठवू लागल्या आहेत. याचे सर्वात मोठे उदाहरण रशियाची लुकऑइल कंपनी असून तिच्यावर रशियाची अर्थव्यवस्था मोठय़ा प्रमाणात निर्भर आहे. याचबरोबर सोशल मीडियावर आता पुतीन यांच्या निकटवर्तीय अधिकाऱयांची देहबोली देखील चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक छायाचित्रांमध्ये पुतीन पूर्ण आत्मविश्वासह बसलेले दिसून येतात, तर त्यांचे अधिकारी नजर खाली करून निराश बसल्याचे दिसून येते. पुतीन यांचे निकटवर्तीय देखील त्यांच्यावर नाराज असल्याचे मानले जातेय.