मॉस्को / वृत्तसंस्था
रशियाच्या कझान शहरातील एका शाळेत एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात सात विद्यार्थी आणि एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. तर असंख्य लोक जखमी झाले आहेत असे वृत्त रशियाच्या वृत्तसंस्थांनी दिले आहे. हा माथेफिरू जर्मन असल्याचे प्राथमिक तपासात आढळल्याचेही प्रतिपादन करण्यात आले.
गोळीबार करणाऱया अटक करण्यात यश आले आहे. मात्र त्याचे नाव प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. हा दहशतवादी हल्ल्याचा प्रकार नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी तपास करताना सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जाणार आहेत. अटक करण्यात आलेली व्यक्ती स्वतःला रक्तपिपासू शक्ती मानत होता. स्वतः आत्महत्या करण्यापूर्वी असंख्य लोकांना ठार करण्याचा त्याचा विचार होता. त्याने आपल्या परवानासहित बंदुकीने हे हत्याकांड घडविले, असे सांगण्यात आले.
किमान 7 विद्यार्थी, 8 विद्यार्थिनी आणि 2 शिक्षकांवर उपचार सुरू असून त्यांच्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या हत्याकांडाचा उद्देश कोणता होता, याची माहिती अटक केलेल्या व्यक्तीच्या चौकशीनंतरच समजणार आहे. हल्लेखोर 19 वर्षांचा आहे.
त्याने मंगळवारी सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर शाळेच्या कॉरीडॉरमध्ये प्रवेश मिळविला आणि अंदाधुंद गोळीबाराला प्रारंभ केला. यावेळी शाळेत मुले जमत होती. त्यामुळे कॉरीडॉरमध्ये गर्दी होती. अनेक मुलांनी व शिक्षकांनी वर्गखोल्यांमध्ये जाऊन स्वतःचे संरक्षण केले. तथापि अनेकजण हल्ल्यात बळी पडले.
पालकांचा आक्रोश
हल्ल्याचे वृत्त समजताच पालकांनी शाळेत धाव घेतली. मृत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आक्रोश केला. शाळा प्रशासनालाही अनेक पालकांनी दोष दिला. अज्ञान व्यक्तीला शाळेच्या परिसरात प्रवेश कसा दिला गेला, याची चौकशीही केली जाईल, असे कझान शहराच्या पोलीस व्यवस्थेने स्पष्ट केले आहे.