ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियाने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंंधक लसीला त्यांच्या आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ‘कोविड-19’ वरील लसीची नोंदणी करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या मुलीलाही ही लस दिली आहे.
व्लादिमीर पुतीन यांनी आज सर्व मंत्रालयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. यावेळी त्यांनी कोरोनावरील प्रभावी लस तयार केल्याची घोषणा केली.
रशियाच्या गामालिया इन्स्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने ही लस विकसित केली आहे. या लसीच्या मानवी चाचण्या दोन महिन्यात पूर्ण झाल्या आहेत. तरी देखील लसीची परिणामकारकता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी काही चाचण्या सुरू राहणार आहेत. ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरू करणार असल्याचे रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
कोणतीही लस तयार करण्यासाठी 10 ते 12 महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, अवघ्या काही महिन्यातच रशियाने ही लस तयार केली आहे. रशियाने या लसीच्या संधोधनासंबंधात कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. तसेच दोन महिन्यात लसीच्या मानवी चाचण्या पूर्ण केल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने लसीच्या उपयुक्ततेवर शंका उपस्थित केली आहे.