युक्रेनसोबतच्या युद्धाचा परिणाम
युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धादरम्यान रशियात आता औषधांची टंचाई जाणवू लागली आहे. सोशल मीडियाद्वारे लोक सातत्याने या टंचाईची माहिती शेअर करत आहेत. युद्ध आणि त्यामुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे औषधांच्या पुरवठय़ात घट झाली आहे. काही आवश्यक औषधे मिळत नसल्याची स्थिती आहे. मॉस्कोसह देशातील अन्य शहरांमध्येही हेच चित्र दिसून येत आहे. औषधे न मिळाल्याने रुग्णांना अवघड स्थितीला तेंड द्यावे लागतेय. रशियात कोरोना महामारीचे संकट कायम असताना ही स्थिती उद्भवली आहे.
सद्यकाळात औषधांची टंचाई ही तात्पुरती असून लवकरच याप्रकरणी स्थिती सुधारणार असल्याचे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे. वाहतूक सुविधांमध्ये अडचणी निर्माण झाल्याने औषधांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचबरोबर पाश्चिमात्य देशांकडून निर्बंध लादण्यात आल्याने औषधांच्या पुरवठय़ावरही त्याचा प्रभाव पडला असल्याचे रशियाच्या आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे. तर हायक्वालिटी मेडिसीन रशियाच्या औषध बाजारपेठेत उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.
पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांनंतर रशिया बऱयाचअंशी एकाकी पडला आहे. मार्चच्या दुसऱया आठवडय़ापासूनच रशियात औषधांचा तुटवडा जाणवू लागला होता. रशियात सर्वाधिक वापरली जाणारी सुमारे 10 औषधे बाजारात उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. अँटी इन्फ्लेमटरी, गेस्ट्रोइंटेंस्टाइनल, अँटीएपिलिप्टिक आणि अँटीकांवल्सेंटसह सुमारे 80 औषधांचा रशियात मोठा तुटवडा आहे. ठिकठिकाणी शोध घेऊनही लोकांना औषधे मिळत नसल्याचे सांगण्यात येते.