युक्रेनियन कर्मचाऱयामुळे रशियन बॉसला 58 कोटींचे नुकसान
युक्रेनच्या एका खलाशाला अटक करण्यात आली आहे. या खलाशाने स्वतःच्या रशियन बॉसच्या एका आलिशान नौकेला बुडविण्याचा प्रयत्न केला होता. तारास ओस्तापचुक (58 वर्षे) याने 156 फूट लांब याटच्या इंजिन रुममध्ये जात व्हॉल्व्स खुले केले होते. यामुळे नौकेत पाणी भरून ती बुडण्याची शक्यता होती. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याच्या विरोधात त्याने हे पाऊल उचलले आहे. लक्झरी याट स्पेनच्या मॅल्लोर्कामध्ये असताना हा प्रकार घडला आहे.
माझ्या कृत्याबद्दल मला कुठलाच पश्चाताप नाही. शक्य झाल्यास पुन्हा असे कृत्य करणार आहे. माझा बॉस एक गुन्हेगार असून त्याच्याकडून विकण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांद्वारे युक्रेनचे लोक मारले जात असल्याचे ओस्तापचुकने न्यायाधीशांसमोर म्हटले आहे.
लेडी अनास्तासिया ही एक आलिशान याट असून त्याचे मालक रोसोबोरोनएक्स्पोर्टचे सीईओ अलेक्झेंडर मिजिव्ह आहेत. त्यांची कंपनी रशियन सुरक्षा उपकरणे म्हणजेच शस्त्रास्त्रs, युद्धनौका, रणगाडे, लढाऊ विमानांची निर्यात करते.
टीव्हीवर युद्ध पाहिल्यावर नौकेला बुडविण्याचे पाऊल उचलले. एका व्हिडिओत हेलिकॉप्टर कीव्हच्या एका इमारतीवर हल्ला करताना दिसून आले. यात वापरण्यात आलेली शस्त्रास्त्रs माझ्या बॉसच्या कंपनीने तयार केली होती. रशियन सैन्य निर्दोष लोकांना लक्ष्य करत आहे, असे ओस्तापचुकने न्यायालयात सांगितले आहे.
याटची किंमत सुमारे 7.7 दशलक्ष इतकी आहे. व्हॉल्वज खुले केल्याने याच्या इंजिन रुमला मोठे नुकसान झाले आहे. तर जामीन मिळाल्यावर ओस्तापचुकने स्पेन सोडून मायदेशी धाव घेतली आहे. युक्रेनमध्ये तो मातृभूमीच्या रक्षणासाठी सैन्यात सामील होणार आहे.