ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस शोधल्याचा दावा करणाऱ्या रशियात 12 ऑगस्टपासून लसीकरण सुरू होणार असल्याची घोषणा रशियाने केली आहे. मात्र, आता याच लसीवरून रशियासोबत ‘वॅक्सिन वॉर’ सुरू झाले आहे. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा या देशांनी रशियावर कोरोना लसीच्या संशोधनाची माहिती चोरल्याचा आरोप केला आहे. या तिन्ही देशांनी यासंदर्भात निवेदन जारी केले आहे.
रशियन हॅकर्स इतर देशात कोरोना संशोधन करणाऱ्या संस्था आणि विद्यापीठांवर सायबर हल्ले करून संशोधन चोरी करतात. APT29 (Cozy Bear) नावाच्या हॅकिंग गटाने कोरोना संशोधनाची माहिती चोरण्याची मोहीम सुरू केली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडाचे हे आरोप रशियाने फेटाळले आहेत.
APT29 (Cozy Bear) नावाचा हॅकिंग गट रशिया सरकार आणि गुप्तचर यंत्रणेच्या सांगण्यावरून काम करतात, असेही या देशांनी निवेदनात म्हटले आहे.