अखेरचे 2 वाणिज्यिक दूतावासही बंद करणार अमेरिका
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिका आणि रशिया यांच्यात सर्वकाही सुरळीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अण्वस्त्रांच्या संस्थेवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर त्वरित अमेरिकेने रशियातील स्वतःचे अखेरचे दोन वाणिज्यिक दूतावास करणार असल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प प्रशासनाने यासंबंधी काँग्रेसला अधिकृत स्वरुपात कळविले आहे.
रशियाच्या ब्लादिवोस्तोक या शहरातील वाणिज्यिक दूतावास कायमस्वरुपी तर येकातेरिनबर्ग शहरातील वाणिज्य दूतावासाचे संचालन तात्पुरत्या स्वरुपात बंद करणार असल्याचे अमेरिकेच्या विदेश विभागाने खासदारांना कळविले आहे.
अमेरिकेवर अलिकडेच झालेल्या सायबर हल्ल्यांमध्ये रशियन हॅकर्सचा हात असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने द्विपक्षीय संबंध तत्काळ प्रभावाने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 2017 पासूनच रशियाने अमेरिकेच्या दूतावासामधील कर्मचाऱयांची संख्या कमी केली आहे. याचमुळे हे वाणिज्यिक दूतावास बंद करावे लागल्याचे या अधिसूचनेत म्हटले गेले आहे.
मॉस्कोतच राहणार अमेरिकेचे मुत्सद्दी
हे वाणिज्यिक दूतावास बंद झाल्यावर अमेरिकेची एकमात्र राजनयिक सुविधा मॉस्को येथील दूतावासातच उपब्लध होणार आहे. 2018 मध्ये ब्रिटन येथे रशियाचा माजी हेर सर्गेई स्क्रिपल याच्या हत्येनंतर अमेरिकेने सिएटल येथील रशियाचा वाणिज्य दूतावास बंद करण्याचा आदेश दिला होता. याच्या प्रत्युत्तरादाखल रशियानेही सेंट पीटर्सबर्ग मधील अमेरिकेचा वाणिज्य दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला होता.