ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियातील ‘एपिवैक’ या दुसऱ्या कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. सायबेरियातील रशियाच्या टॉप सिक्रेट विषाणू विज्ञान संशोधन केंद्रातील वेक्टर इन्स्टिट्यूटकडून ही माहिती देण्यात आली.
वेक्टर इन्स्टिट्यूटकडून ही लस तयार करण्यात आली असून, क्लिनिकल ट्रायलच्या पहिल्या दोन टप्प्यात ही लस यशस्वी झाली आहे. त्यामुळे तीन आठवड्यात वेक्टर इन्स्टिट्यूटच्या या लसीला मंजुरी दिली येऊ शकते, असे रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराशको यांनी राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना सांगितले.
मंजुरी मिळाल्यानंतर 5 हजार जणांना ही लस देण्यात येणार आहे. 60 वर्षांवरील 150 जणांना ही लस देण्यात येईल. त्यामुळे 60 वर्षांवरील व्यक्तींना ही लस किती प्रभावी ठरते हे समजणार आहे. रशियाने यापूर्वी ऑगस्ट महिन्यात ‘स्फुटनिक व्ही’ ही लस आणली आहे. रशियात आणखी एका लसीची मानवी चाचणी पूर्ण झाली आहे. महिन्याभरात त्याची नोंदणी होणार आहे.