मुंबई प्रतिनिधी
रशिया- युक्रेन युद्धामुळे पहिल्यांदाच सर्वात स्वस्त असणारे पामतेल हे आंतरराष्ट्रीय बाजारात प्रमुख चार खाद्यतेलांत सर्वात जास्त महाग झाले आहे. कच्च्या पाम तेलाची (सीपीओ) किंमत १९१० डॉलर तर कच्च्या सोया तेलाची किंमत १८५५ डॉलर प्रतिटन झाली आहे. याची झळ स्थानिक बाजारांत सर्वसामान्य नागरिकांना आहे.
युद्धामुळे भारतात येणारा सूर्यफूल तेलाचा पुरवठा थांबल्याने खरेदीदार पामतेल आणि सोयाबीन तेलाकडे वळत आहेत त्यामुळे त्यांच्या दरात मोठी वाढ होत आहे. मार्चमध्ये ज्या पाम तेलाचे सर्वात जास्त दर दिसत आहे, त्याचे भारतीय बाजारात दीड ते दोन महिन्यांनी अजुन वाढलेले दर दिसून येतील.
पूर्व युरोपमधील काळ्या समुद्राचा प्रदेशात सूर्यफूल तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु, युद्धामुळे भारताचा सूर्यफूल तेलाचा पुरवठा घटला आहे. या युद्धाचा फायदा घेत मलेशिया आणि इंडोनेशियाच्या तेल कंपन्यांनी खाद्यतेलाचे दर महाग केले आहेत. आशियाई आणि आफ्रिकन देशांत महागाईने त्रस्त ग्राहकांच्या खिशावर पाम तेलाच्या किमतीत झालेल्या या वाढीचा मोठा परिणाम होऊ शकतो.