तुर्कस्तानात दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची बैठक
ब्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांची तुर्कस्तानात लवकरच भेट होऊ शकते असे बैठकीनंतर रशियाच्या शिष्टमंडळाने एका सदस्याने म्हटले आहे.
या बैठकीत रशियाने कीव्ह आणि युपेनचे शहर चेर्निहाइव्हच्या परिसरातील स्वतःची सैन्य मोहीम कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. याच्या बदल्यात युक्रेनने आंतरराष्ट्रीय हमीसह तटस्थ राहण्याचे आश्वासन दिले आहे. अशा सिथतीत युक्रेन नाटोमध्ये सामील होण्याचा स्वतःचा हट्ट सोडणार असल्याचे मानले जात आहे. यानंतरच रशिया स्वतःच्या सैन्यमाघारीची घोषणा करणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील युद्ध लवकरच संपण्याची शक्यता आहे.
कुठल्याही आघाडीत सामील होणार नाही तसेच विदेशी सैनिकांना स्वतःच्या भूमीवर येऊ देणार नसल्याचा प्रस्ताव युक्रेनने मांडला होता. परंतु याकरता युक्रेनला सुरक्षेची हमी हवी आहे. इस्रायल, नाटो सदस्य देशांना युक्रेन स्वतःच्या वतीने गॅरेंटर करू शकतो. आमच्या प्रस्तावात रशियाच्या कब्जातील क्रीमियावर स्वतंत्रपणे चर्चा केली जाणार असल्याचे युक्रेनच्या शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले आहे.
युक्रेनने दिला भरवसा
प्रस्तावानुसार युक्रेन कुठल्याच गटात सामील होणार नाही. तसेच बिगर आण्विक राष्ट्र म्हणून स्वतःचे स्थान कायम राखणार आहे. युक्रेनच्या क्षेत्रात विदेशी सैन्याला आमंत्रित केले जाणार नाही. तसेच गॅरेंटर देशांच्या सहमतीनेच सैन्यअभ्यास करणार असल्याचे युक्रेनने प्रस्तावात म्हटले आहे. युक्रेनच्या प्रस्तावांची पडताळणी करणार आहोत. त्यानंतर राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना अहवाल सादर करू असे उद्गार रशियाचे उपसंरक्षणमंत्री अलेक्झेंडर फोमिन यांनी काढले आहेत.
रशियाचे विदेश मंत्री लवकरच भारतात
रशिया विरोधी नागरिकांना रशियाचा व्हिसा मिळणे अवघड असल्याचे उद्गार विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी काढले आहेत. लावरोव्ह हे लवकरच भारत दौऱयावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱयादरम्यान सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदीसंबंधी बोलणी होण्याची शक्यता आहे.
ब्रिटनने उचलले पाऊल
तर युक्रेनला ब्रिटनने स्टार स्ट्रीक सिस्टीम देण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाने आण्विक हल्ल्याची धमकी दिल्याने ब्रिटनने हे पाऊल उचलले आहे. तर युक्रेनच्या सर्वात मोठय़ा दूरसंचार सेवा प्रदात्यावर सायबर हल्ला झाला आहे. हा सायबर हल्ला रशियानेच घडवून आणला असल्याचे मानले जातेय. रशिया-युक्रेन युद्ध पाहता अमेरिकेने जर्मनीत 6 नौदल इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर जेट आणि 240 सैनिक तैनात केले आहेत. रशियाच्या हल्ल्याचे समर्थन करण्याचे प्रतीक ‘झेड’ अक्षर प्रदर्शित करणाऱया व्यक्तींवर जर्मनीत खटला चालविला जाऊ शकतो.
झेलेंस्कींचे पत्र, भडकले पुतीन
दुसरीकडे रशियाचे अब्जाधीश रोमन अब्रामोविच हे युक्रेनच्या अध्यक्षांचे पत्र घेऊन राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याकडे पोहोचले होते. या पत्रात झेलेंस्की यांनी युद्ध रोखण्यासंबंधीच्या अटी नमूद केल्या होत्या. हे पत्र वाचून संतप्त पुतीन यांनी ‘मी युक्रेनला उद्ध्वस्त करून टाकीन’ असे उद्गार काढल्याचे समजते.
ब्रिटनची रशियाला ऑफर
ब्रिटनकडून रशियाला एक ऑफर देण्यात आली आहे. रशियाने युद्ध रोखल्यास आणि युक्रेनमधून स्वतःचे सैन्य माघारी घेतल्यास ब्रिटन रशिया आणि त्याच्या कंपन्यांवरील निर्बंध हटविणार असल्याचे ब्रिटनच्या विदेश मंत्री लिझ ट्रस यांनी म्हटले आहे.
जी-7 देशांनी मागणी फेटाळली
जी-7 समुहाने रशियन गॅससाठी रुबलमध्ये पेमेंट करण्याची पुतीन यांची मागणी नाकारली आहे. जी-7 चे सर्व ऊर्जामंत्री रशियाकडून ऊर्जा आयातीसाठी रुबलमध्ये पेमेंट करणार नाही. रुबलमध्ये पेमेंट करण्याची मागणी करारानुरुप नसल्याचे जर्मनीचे ऊर्जामंत्री रॉबर्ट हेबेक यांनी म्हटले आहे.