सुधीर मुनगंटीवार साहेबांनी उल्लेख केलेले रसेल फॉस्टर शेवटी सापडले. काल सापडलेले रसेलराव आणि हे रसेलराव एकच निघाले, ते असो. पण रसेलरावांनी प्रत्येक इंग्रजी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींची काही गुणवैशिष्टय़े सांगितली आहेत. त्यावरून त्यांची चतुराई लक्षात येते. त्यांनी मराठी महिन्यांनुसार ही गुणवैशिष्टय़े सांगायचे ठरवले असते तर त्यांना अधिक मासात जन्मलेल्या व्यक्तींवरदेखील लिहावे लागले असते. शिवाय दाते पंचांग आणि टिळक पंचांग या दोन्हीनुसार लिहायचे म्हटले तर एकूण प्रकरण आणखीन अवघड झाले असते.
रसेलरावांच्या आधी अनेक वर्षे लिंडा गुडमन या महिलेने याप्रकारे व्यक्तींची राशिनिहाय स्वभाववैशिष्टय़े सांगणारे भलेमोठे पुस्तक लिहिले आहे. अस्मादिकांनी हे पुस्तक पन्नास वर्षांपूर्वी मोठय़ा चवीने वाचले आहे. नुसतेच मोठय़ा चवीने नव्हे, तर कष्टपूर्वक. कारण त्यातल्या अवघड इंग्रजी शब्दांचे अर्थ बघण्यासाठी वीरकर शब्दकोश अपुरा पडला होता! धीरगंभीर भारदस्त तपशिलांखेरीज अमुक राशीच्या व्यक्तीचे कोणत्या राशीच्या व्यक्तीशी प्रेमप्रकरण जुळू शकेल वगैरे बराच रोमहर्षक मसाला या पुस्तकात आहे. कॉलेजमध्ये असताना बहुतेकांनी हे पुस्तक कुतूहलापोटी वाचलेले असते. पुस्तक वाचून स्वतःला अनुरूप राशीच्या व्यक्तीवर जीव टाकायला सुरुवात केलेली असते.
रसेलरावांनी काढलेले निष्कर्ष आपल्याकडच्या लोकांना लागू पडतीलच असे नाही. एकतर आपण मुळातच विश्वगुरु. पण ते जाऊ देत. मार्चमध्ये जन्मलेल्या मुलांना दम्याचे विकार जडतात असे त्यांचे म्हणणे. कारण काय तर म्हणे या मुलांना पुरेसा सूर्यप्रकाश आणि ड जीवनसत्त्व मिळत नाही. आपल्याकडे फेब्रुवारी ते मे उत्तम. अगदी भाजून काढणारा सूर्यप्रकाश असतो. तेव्हा ते देखील जाऊ देत.
पण या धर्तीवर आपल्याकडे कोणीतरी जाणकार व्यक्तीने असे लेखन करायला हवे. राजकारण हा आपल्या गप्पांचा आणि व्हॉट्सअप विद्यापीठातल्या चर्चासत्रांचा लोकप्रिय विषय असतो. तेव्हा कोणत्या महिन्यात जन्मलेल्या नेत्यांना घोडेबाजारात चांगला भाव मिळेल, सरकार पाडायचे असेल तेव्हा कोणत्या महिन्यात जन्मलेले आमदार विरोधी पक्षनेत्याच्या संपर्कात असतील, कोणत्या महिन्यात जन्मलेल्या उथळ आणि कंठाळी अँकरने रेकून आणि रेटून सांगितलेल्या खोटय़ा बातम्या लोकांना खऱया वाटतील, वगैरे माहिती देणारे पुस्तक उत्तम खपेल.