प्रतिनिधी/ कराड
रस्ता सुरक्षा अभियानाचा कराड शहरात बुधवारी दिमाखात शुभारंभ झाला. हेल्मेट वापरा…अपघात टाळा, अपघातात दुःख…सुरक्षेत सुख यासह अनेक घोषणा देत महारॅलीचा शुभारंभ झाला. वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकारी, रिक्षाचालकही रॅलीत सहभागी झाले होते.
पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते आरटीओ अधिकारी विनोद सगरे यांच्या उपस्थितीत महारॅलीचा शुभारंभ झाला. याप्रसंगी वाहतूक नियंत्रक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक सरोजनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात रॅलीचा शुभारंभ झाला. रॅलीत आरटीओ कार्यालयाची शासकीय वाहने,,वाहतूक पोलिसांची चारचाकी वाहने, मोटार ड्रायव्हिंग स्कूलची वाहने, अधिकृत पीयुसी केंद्राची वाहने, परिवहन विभागाची वाहने सहभागी झाली होती.
वाहतूक पोलीस, आरटीओ कार्यालयाचे कर्मचारी यांनी हेल्मेट घालून दुचाकीसह रॅलीत सहभाग घेतला होता. रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करत रॅली वारूंजी फाटा, कोल्हापूर नाका, पोपभाई पेट्रोलपंप चौक, दत्त चौक, विजय दिवस चौक, भेदा चौक मार्गे रॅली भेदा चौकात आली. भेदा चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला.
आरटीओ विनोद सगरे म्हणाले, रस्त्यावरून प्रवास करताना नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नियमांचे पालन करून वाहने चालवल्यास अपघातापासून आपण दूर राहू शकतो. हेल्मेटचा वापर करण्यासाठी सर्वांनी आग्रही असायला हवे.
वाहतूक पोलीस कर्मचारी संतोष पवार, सुधीर भोसले, शरद चव्हाण, ज्योती पाटील, विक्रम पोतेकर, सोनम पाटील, अनिल पाटील, प्रियांका यादव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.