शहरात वाहतूक कोंडी जटील : वाहनधारकांना त्रास : कामे जलदगतीने करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील वाहतूक कोंडीचा भार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच सध्या शहरातील रस्त्यांच्या विकासकामांमुळे आणखीनच भर पडत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे शहरांतर्गत वाहतुकीचा बोजवारा उडाला असून रस्त्यांचा विकास होत असला तरी वाहतुकीची कोंडी होत आहे. वाढती वाहने… अरुंद रस्ते… रस्त्यांची विकासासाठी खोदाई… काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक… यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
शहरातील कॉलेज रोड, काँग्रेस रोड, चन्नम्मा चौक, आंबेडकर रोड, जुना पी. बी. रोड, ध. संभाजी चौक, क्लब रोड आदी रस्ते काँक्रीटचे बनविले जात आहेत. या मुख्य रस्त्यांवर विकासासाठी खोदाई करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. त्यातच रस्त्यावर मोकाट फिरणाऱया जनावरांची भर पडत आहे. बसस्थानकासमोरील जुन्या पी. बी. रोडवर काँक्रिटीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. पार्किंगला जागा नसल्यामुळे रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंग, बाजारपेठेतील दुकानदारांसह ग्राहकांच्या रस्त्यांलगत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा विळखा वाढला आहे. याबरोबरच खडेबाजारच्या प्रवेशद्वाराजवळ वाहतूक कोंडी होत असल्याने बाजारात येणाऱया नागरिकांना याचा फटका बसत आहे. या रस्त्यांवर खासगी वाहनांसह परिवहन मंडळाच्या स्थानिक बसेसची संख्या अधिक आहे. मात्र, रस्त्यांच्या कामामुळे सिग्नलजवळील चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. परिणामी इतरत्र रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढत आहे. त्यामुळे काँक्रिटीकरणाचे काम जलदगतीने करून पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.