दांडो ते पोलीस स्थानक रस्ता धोकादायक, नगरसेवक मेशू डिकॉस्ता, संगमेश्वर नाईक यांचा आंदोलनात सहभाग, 31 पर्यंत दुरुस्तीचे आश्वासन
प्रतिनिधी /सांगे
सांगे येथील दांडो ते पोलीस स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर मधोमध खोदकाम करून जलवाहिनी टाकण्यात आली असून दुरुस्ती न केल्याने सध्या रस्त्याची स्थिती बिकट झाली आहे. यावर आवाज उठविण्यासाठी व सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष वेधण्यासाठी सांगे नगरपालिकेचे नगरसेवक मेशू डिकॉस्ता आणि संगमेश्वर नाईक यांनी काही स्थानिक लोकांच्या मदतीने मंगळवारी काही काळ रास्ता रोको केला. पोलिसांनी हस्तक्षेप करून रस्ता नंतर वाहतुकीस खुला केला. यानंतर घटनास्थळी भेट दिलेले सार्वजनिक बांधकाम खाते, काम विभाग 20 चे कार्यकारी अभियंता जमादार यांनी 31 पर्यंत काँक्रिट टाकून रस्ता दुरुस्त करून देणार असल्याचे आंदोलकांना सांगितले.
रास्ता रोको करण्याविषयी सोमवारी समाजमाध्यमांत वृत्त टाकण्यात आले होते. रास्ता रोकोचा सगळा खेळ सुमारे तास-दीड तासभर चालला. डिकॉस्ता यांना पोलिसांनी रस्त्यावरून बाजूला काढण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रथम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांना दाखल करा ही मागणी लावून धरली. मात्र सांगेचे पोलीस निरीक्षक सचिन पन्हाळकर व इतर पोलीस त्यांना रस्त्यावरून बाजूला काढण्याचे प्रयन्त करतच राहिले.
सध्या या रस्त्याची स्थिती बिकट झाली असून पावसामुळे चिखल होऊन निसरडा झालेला आहे. मुळात पावसाच्या तोंडावर रस्ता मधोमध फोडून जलवाहिनी टाकण्याची गरजच काय, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. जलवाहिनी टाकली, पण पाणीपुरवठा चालू केला काय, लोकांना पाणी पुरविले जात आहे काय असे अनेक सवाल लोक करत आहेत. वास्तविक एप्रिल-मे महिन्यांत दांडो ते सांगे अशी टाकण्यात आलेली जलवाहिनी घाईगडबडीत घातली असून विकासाच्या नावावर अर्धाअधिक रस्ता वाहतुकीस धोकादायक करून ठेवला गेला आहे.
रस्ता वाहतुकीस धोकादायक
या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम महिन्याभरात पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे या आशयाचे निवेदन सांगे येथील समाजसेवक जार्विस फर्नांडिस यांनी महिनाभरापूर्वी सांगेचे उपजिल्हाधिकारी सागर गावडे यांना सादर केले होते. पावसाच्या तोंडावर हे काम केले गेल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. एकाच वेळी दोन वाहने सुटत नाहीत. दुचाकीस्वारांना खूप अडचणीचे होत आहे. बऱयाच ठिकाणी चिखल निर्माण झाला आहे.
…तर 1 ऑगस्टला पुन्हा रास्ता रोको
या कामाची निविदा 2016 मध्ये काढण्यात येऊन 30/11/2016 रोजी कंत्राटदाराला कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. वास्तविक ऐन पावसाच्या तोंडावर काम सुरू न करता बरेच पूर्वी करणे गरजेचे होते. सध्या विकासाच्या नावावर लोकांच्या जिवाशी खाते खेळत आहे. तसेच सांगेचे प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सांगेचे प्रशासन सांगेवासियांना गृहीत धरत असून लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मेशू डिकॉस्ता यांनी यावेळी केला. कोविडमुळे आम्ही जास्त लोकांना बोलावले नाही. अधिकाऱयांनी आश्वासन दिल्याप्रमाणे 31 जुलैपूर्वी काँक्रिट टाकून रस्ता सुरळीत न केल्यास 1 ऑगस्टला पुन्हा रास्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी पीडब्ल्यूडी हाय हाय, स्वाभिमानी सांगेकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.