डेनेज चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने सांडपाणी रस्त्यावर
प्रतिनिधी /बेळगाव
विश्वेश्वरय्या चौक ते जाधवनगरपर्यंतच्या रस्त्याचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. मात्र याठिकाणी डेनेज चेंबर ओव्हरफ्लो झाले असून सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे प्रथम डेनेज चेंबरची दुरुस्ती करावी, मगच रस्त्याचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.
शहरातील विविध रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विश्वेश्वरय्या चौकापासून हनुमाननगरकडे जाणाऱया रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. या रस्त्याशेजारी विविध सरकारी कार्यालये असून रस्त्याचा विकास आवश्यक आहे. पण काही रहिवासी वसाहती असल्याने रहिवाशांना भेडसावणाऱया समस्यांचे निवारण करणे आवश्यक आहे. येथील ड्रेनेजवाहिनी तुंबल्याने चेंबर कित्येक महिन्यांपासून वाहत आहे. डेनेज चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने सांडपाणी साचून राहत आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत सातत्याने तक्रारी करूनही याची दखल घेण्यात आली नाही. पण या समस्येचे निवारण करण्यापूर्वीच रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी याला आक्षेप घेतला असून प्रथम डेनेजवाहिनीच्या समस्येचे निवारण करा, नंतरच रस्त्याचा विकास करा, अशी मागणी होत आहे.