कणकवली:
येथील पोस्टानजीक खरेदी करत असताना सौ. रतन रामचंद्र राणे (रा. कणकवली) यांचे हरविलेले मंगळसूत्र याच परिसरात दुकान असणाऱया, माजी नगरसेविका सौ. नंदिनी धुमाळे-मुसळे यांना सापडले. त्यांनी ते पोलिसांकडे सुपुर्द केले. पुढे पोलिसांनी हे मंगळसूत्र राणे यांच्याकडे सुपुर्द केले. मुसळे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
रतन राणे येथील पोस्टानजीक गुरुवारी सकाळी खरेदीसाठी आल्या होत्या. खरेदी करून घरी गेल्यानंतर त्यांना आपले मंगळसूत्र हरविल्याचे लक्षात आले. दरम्यान, हे मंगळसूत्र येथेच दुकान असलेल्या माजी नगरसेविका नंदिनी मुसळे यांना सापडले. मुसळे यांनी मंगळसूत्र येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे डय़ुटी बजावत असलेले वाहतूक पोलीस संदेश आबिटकर यांच्याकडे दिले. आबिटकर यांनी ‘मंगळसूत्र सापडले असून, ज्याचे असेल, त्याने पोलीस ठाण्यात येऊन ओळख पटवून, घेऊन जावे’ असा मेसेज काही ‘व्हॉट्सऍप ग्रुप’वर पाठविला. दरम्यान, हा मेसेज वाचून कोणीतरी माहिती दिल्यानुसार राणे यांनी सायंकाळच्या सुमारास पोलीस ठाणे गाठत मंगळसूत्र ताब्यात घेतले. यावेळी वाहतूक पोलीस संदेश आबिटकर, हवालदार चंद्रकांत माने, कॉन्स्टेबल तनुजा तावडे उपस्थित होत्या.