स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : रहिमतपूरच्या बारमालकासह सहाजणांना अटक : बारमालक राष्ट्रवादीचा पदाधिकारी
प्रतिनिधी/ सातारा
स्थानिक गुन्हे शाखेने सातारा व रहिमतपूर येथे कारवाई करुन 1 लाख 30 हजार 136 रुपये किंमतीची देशी विदेशी दारु व मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत करत धडक कारवाई केली आहे. या कारवाईत रहिमतपूर व्हाया सातारा कनेक्शन उघडकीस आले असून यामध्ये एका राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असलेल्या रहिमतपूरच्या बारमालकासह सहाजणांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लॉकडाऊनच्या काळात दारुचा प्रचंड काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. चौपट किंमतीने दारु विकून काळाबाजार करणारे उखळ पांढरे करु लागले होते. पोलीस बंदोबस्तात गुंतल्याचा गैरफायदा घेत असलेल्या प्रवृत्तींवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते व अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी तपास पथकास कारवाईचे आदेश दिले होते.
या पथकास मिळालेल्या माहितीनुसार सातारा शहरातील मधुकुंज फॅमिली रेस्टॉरन्ट करंजकरनगर विलासपूर सातारा येथील बोळामध्ये देवराज मोहन कोकीळ (वय 29 वर्षे गणेशनगर विलासपूर सातारा), प्रसाद विकास महामुने (वय 22 वर्षे रा. कारंजकरनगर विलासपूर सातारा) व विशाल सधीर कारंजकर (रा. रहिमतपर ता. कोरेगाव) हे बेकायदा दारु विक्री करीत होते त्यांच्यावर पथकाने छापा टाकून त्यांचे कब्जातून 86 हजार 300 रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या व एक ऍप्रिला कंपनीचा मोपेड जप्त केली. त्यांच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या संशयित आरोपींकडून दारुचे मालाबाबत सखोल विचारपूस केली असता त्यांनी दारु रहिमतपूर येथून आणली असल्याचे सांगितल्यानंतर हे कनेक्शन उघड झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रहिमतपूर येथे टकले बोरगाव रस्त्यावर सापळा रचला असता यामध्ये दारुचे अवैध वाहतूक करत असलेले विशाल सुधीर कारंजकर (वय 33 वर्षे रा.जुने पोष्ट शेजारी रोकडेगल्ली रहिमतपूर) व तौफिक नजीर नदाफ (वय 23 रा.रोकडेश्वर मंदिराशेजारी रहिमतपूर ता. कोरेगाव) हे दोघेजण जाळय़ात आले. 43,836 रुपये किमतीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या द हिरो पॅशन मोटार सायकल जप्त करण्यात आली असून त्यांचे विरुध्द रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार तानाजी माने, प्रविण शिंदे, पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, निलेश काटकर, संजय जाधव, विजय सावंत, गणेश कचरे यांनी सहभाग घेतला आहे. त्यांचे वरिष्ठ अधिकाऱयांनी अभिनंदन केले आहे.
सातारा व रहिमतपुरात दोन्ही अवैध दारु विक्री व वाहतूक करताना ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे विचारणा केली असता त्यांनी हा दारुचा माल रहिमतपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेला बार मालक सचिन सुर्यकांत बेलागडे (वय 48 वर्षे रा. रोकडेश्वर गल्ली रहिमतपूर ता.कोरेगाव) याच्याकडून विकत घेतला असल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मग त्यालाही तपासासाठी अटक केली असून मानवतेवर आलेल्या संकटाशी लढा सुरु असताना दारुचा काळाबाजार करणाऱया राजकीय पदाधिकाऱयाचा बुरखा या कारवाईमुळे फाटला आहे.