भाजपचे सर्व आमदार एकसंध, कोणीही फुटणार नाहीत,भाजपाच पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेवर येणारःमुख्यमंत्री
प्रतिनिधी /पणजी
आगामी निवडणुकीसंदर्भात राज्यात राजकीय हालचालींना बराच वेग आला असून मगो नेते सुदिन ढवळीकर यांच्या भेटीला मंत्री मायकल लोबो, माजी मंत्री व गोवा फॉरवर्डचे नेते विनोद पालयेकर, भाजप आमदार बाबूश मोन्सेरात हे देखील गेले. तिन्ही नेत्यांबरोबर ढवळीकर यांच्या स्वतंत्र बैठका झाल्या. ‘चाय पे चर्चा’ असे सुदिन ढवळीकर म्हणाले. दरम्यान, सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मायकल लोबो हे भाजप सोडणार नाहीत. त्याचबरोबर भाजपला या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळेल, भाजपचे सर्व आमदार पक्षाशी एकसंध असल्याचा दावा केला.
आगामी निवडणुकासंदर्भात काँग्रेसमध्ये अनेक जण प्रवेशास इच्छुक असल्याच्या पार्श्वभूमीवर मगो नेते सुदिन ढवळीकर यांनीही आपल्या हालचाली चालू ठेवल्या आहेत. गुरुवारी राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर सुदिन ढवळीकर यांनी पणजीतील एका तारांकित हॉटेलमध्ये अनेक नेत्यांबरोबर चर्चा केली. रात्री उशिरा भाजपच्या आणखी एका मंत्र्याबरोबर ढवळीकर यांची चर्चा झाली.
ढवळीकरांची पालयेकरांशी चर्चा
मगो नेते सुदिन ढवळीकर हे दिवसभर पणजीत मुक्काम ठोकून होते. निवडणूकपूर्व त्यांनी अनेक पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. दुपारच्या दरम्यान गोवा फॉरवर्ड नेते व माजी मंत्री तथा शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर हे पणजीत आले. त्यांनी सुदिन ढवळीकर यांची भेट घेऊन सखोल चर्चा केली. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत नेमके काय शिजले हे समजले नाही.
ढवळीकर-मोन्सेरात यांच्यात उहापोह
पालयेकर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर सुदिन ढवळीकर यांच्या भेटीसाठी पणजीचे भाजप आमदार बाबूश मोन्सेरात हे आले. दोन्ही नेत्यांनी आगामी निवडणूक संदर्भात बराच वेळ उहापोह केला.
हिडन अजेंडा नाही, फक्त चाय पे चर्चा : सुदिन
भाजपमधील बंडखोर नेते व राज्याचे कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो हे सायंकाळी सुदिनबरोबर चर्चा करण्यासाठी पणजीत आले. दोघांनीही सुमारे दोन तास चर्चा केली. या बैठकीनंतर काही पत्रकारांनी प्रश्न केला असता सुदिन ढवळीकर म्हणाले आम्ही केवळ चर्चा करतो. आमच्या बैठका केवळ ‘चाय पे चर्चा ’ होती. बस ! या मागे हिडन अजेंडा कोणताही नाही.
इट वॉज ओन्ली प्रँडली टॉक : मायकल
मंत्री मायकल लोबो यांना विचारले असता ते म्हणाले की, ढवळीकर आणि मी मित्र आहेत. आमची चर्चा केवळ मित्रत्वाच्या नात्यातून झालेली आहे. राजकारणावर चर्चा केलेली नाही. इट वॉज ओन्ली पेंडली टॉक! असे ते म्हणाले.
गोव्यात केवळ भाजपचेच सरकार भाजपमधून कोणीही बाहेर पडणार नाही
दरम्यान या राजकीय खलबतांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की आगामी निवडणुकीत देखील भाजपचाच विजय आहे. आम्हाला गोव्यात पूर्ण बहुमत मिळेल, असा दावा त्यांनी केला. जनतेचा भाजपला पूर्ण पाठिंबा आहे. पक्षात बंडखोरी वाढलेली आहे. त्यावर काही उपाययोजना काढणार आहात का ? असे विचारता मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी मुळीच झालेली नाही. होणार देखील नाही, असे निवेदन केले. केंद्रात व राज्यात पक्ष सत्तेवर आहे. त्यामुळे कोणीही भाजपमधून बाहेर पडणार नाही, याची शाश्वती देतो, असे ते म्हणाले. मंत्री मायकल लोबो हे कोणाही नेत्यांना भेटू शकतात. ते ज्यांना भेटले त्यांची बैठक केवळ मित्रत्वाची होती. त्यामुळे मायकल लोबो हे भाजप सोडणार ही केव अफवा आहे, असे ते म्हणाले.
पालयेकर मला देखील भेटले : मुख्यमंत्री
सुदिन ढवळीकर यांना भेटून झाल्यानंतर विनोद पालयेकर हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना देखील भेटले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना विचारले असता, भाजपमध्ये आणखी बरीच नेते मंडळी लवकरच प्रवेश करणार आहेत, असे ते म्हणाले. कोण कोणाला भेटले यात राजकारण कसले आलेय? माजी मंत्री विनोद पालयेकर हे शुक्रवारी आपल्याला भेटायला आले. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड हे देखील भेटायला आले होते.
आगामी काळात बरेच नेते भाजपात येणार
केंद्रात व गोव्यात पक्ष सत्तेवर असताना कोणी आमदार पक्ष सोडून जाईल काय ? असा उलट सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र आगामी दिवसात बरेच नेते भाजपमध्ये येणार आहेत. योग्य वेळी कळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पक्षाला गोव्यात पुन्हा एकदा जनाधार मिळणार व आमचेच सरकार सत्तेवर येईल, असेही ते पुढे म्हणाले.