घटस्थापनेपासून राजकीय घडामोडी होणार गतिमान : काँग्रेसचे अनेक नेते सीमोल्लंघन करण्याच्या मार्गावर.काँग्रेस-गोवा फॉरवर्डच्या भूमिकेवर पुढचे अंदाज
प्रतिनिधी /पणजी
गोव्याला, गोमंतकीय जनतेला प्रतीक्षा आहे ती नवरात्रोत्सवाची, घटस्थापनेची आणि बऱयाच राजकीय घडामोडींची! होय, 7 ऑक्टोबर घटस्थापनेचा पवित्र दिवस. सर्वपितृ अमावास्येपर्यत मूग गिळून गप्प बसलेली अनेक नेते मंडळी या दिवशी तोंड उघडणार आहे. काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड आपमध्ये जाण्याचा निर्णय घोषित करतील. गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई करणार एक धमाका. सुदिन ढवळीकर सोडणार मौनव्रत. दयानंद नार्वेकरसह अनेक नेते सीमोल्लंघन करण्याच्या मार्गावर असून ‘आप’ नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील दि. 7 रोजी गोव्यात येत आहेत.
पितृपंधरवडा असल्याने अनेक नेत्यांनी आपला राजकीय निर्णय घेतला नाही. लुईझिन फालेरो हे पितृपंधरवडय़ात एका बंगाली राजकीय पक्षात गेले आणि काँग्रेसचा राजीनामा दिला. काँग्रेस पक्षाने फार मोठय़ा व्यक्तींना अद्याप प्रवेश दिलेला नाही. मात्र हा पक्ष देखील 7 तारीख पासून काही नेत्यांना पुनर्प्रवेश देणार आहे.
अंधश्रद्धेचे बळी राजकीय पक्ष
सर्वच राजकीय पक्ष अंधश्रद्धेला बळी पडलेले. पितृपंधरवडय़ात कोणत्याही चांगल्या गोष्टी करू नयेत असे अधिकृतपणे सर्व राजकीय मित्रांना सांगणारी व सल्ला देणारी व्यक्ती ही देखील गोव्यातील एक प्रसिद्ध राजकीय व्यक्तीच आहे. मात्र त्यात सर्वच राजकीय पक्ष गुरफटले गेले आणि गोव्यातील भाजप, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगो, आणि आप हे पाचही प्रमुख राजकीय पक्ष त्यात अडकले.
काँग्रेसच्या बिकट अवस्थेचे काय?
आता उद्या बुधवारी दि. 6 रोजी सर्वपितृ अमावास्या झाल्यानंतर गुरुवार दि. 7 रोजी घटस्थापना आहे. या पवित्र दिनी या पूर्वी घोषणा केल्यानुसार गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई हे कोणती घोषणा करणार ? याकडे साऱया जनतेचे लक्ष वेधले आहे. काँग्रेस पक्ष समविचारी पक्षांशी आघाडी करू असे आता लुईझिन फालेरो यांच्यासह अनेकांनी पक्ष सोडल्यानंतर सांगत आहे.
विजय सरदेसाईंचा पवित्रा होणार स्पष्ट
काँग्रेस पक्ष या अतिशय बिकट अवस्थेत देखील गोवा फॉरवर्डबरोबर युती करण्यास राजी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती करण्याच्या विचारात हा पक्ष आहे. त्यामुळे घटस्थापनेला विजय सरदेसाई आता कडक पवित्रा घेणार की काय, हे पहावे लागेल. सरदेसाई यांनी काँग्रेसला घटस्थापनेची ‘डेडलाईन’ दिली आहे.
आलेक्स रेजिनाल्ड, नार्वेकर आपच्या मार्गावर
काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड हे देखील दि. 7 रोजीच काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून ‘आप’मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांना विचारले असता दोन दिवस थांबा एवढेच ते म्हणाले. याचा अर्थ ते दि. 7 रोजी निर्णय घेतील. प्राप्त माहितीनुसार काँग्रेसचे माजी नेते दयानंद नार्वेकर हे देखील ‘आप’ मध्ये जाण्याचा विचार करतील. त्यांना काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा ऑफर दिली आहेच.
अरविंद केजरीवाल घटस्थापनेला गोव्यात
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे घटस्थापने दिवशीच गोव्यात येत आहेत. दि. 7 रोजी ते दुपारपर्यंत गोव्यात पोहोचतील. त्याचदिवशी एका सभेचे आयोजन केले असून त्यात सर्वांसाठी रोजगार योजनेचा शुभारंभ ते करतील. यापुर्वीच्या दोन गोवा भेटीत त्यांनी वीज आणि रोजगारासंदर्भात मोठय़ा घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. आता या तिसऱया भेटीत ते कोणत्या घोषणा करतात, हे पहावे लागले.
सुदिन ढवळीकर सोडणार मौनव्रत
मगो पक्षाच्या नेत्यांनी एवढे दिवस मौन पाळले होते. त्यांनाही पितृपक्ष लागला होता. आता दि. 7 पासून मगो पक्ष आक्रमक होणार आहे. पहिल्याच दिवशी सुदिन ढवळीकर काही महत्त्वाच्या घोषणाही करण्याची शक्यता आहे.
गोमंतकीय जनतेला गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवाची प्रतीक्षा असते. राज्यातील सर्व मंदिरे या शारदोत्सवाची वाट पहात असतात. दहा दिवस भक्ती उत्सवात सारे रममाण होतात. यंदाही धार्मिक पारंपरिक कार्यक्रमांवर मंदिराच्या समित्यांनी नियंत्रण घातलेले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर साऱयांनीच उत्सवात महामारीचे भान राखून मर्यादित कार्यक्रम करण्याचे ठरविले असले तरी साऱयांच्या नजरा खिळलेल्या आहेत त्या घटस्थापनेकडे!