गुगलच्या सीईओंना सिनेटकडून पाचारण
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीला आता 1 आठवडय़ापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. तत्पूर्वी समाजमाध्यम कंपन्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ट्विटर, फेसबुक आणि गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची चौकशी केली जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यांना सिनेटमध्ये पाचारण करण्यात आले आहे.
तंत्रज्ञान कंपन्यांचा डेमोक्रेटिक पार्टीकडे ओढा असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांनी केला आहे. या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची चौकशी केली जाणार आहे. सिनेटच्या वाणिज्य समितीने ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी, फेसबुकचे मार्क जुकेरबर्ग आणि गुगलचे सुंदर पिचाई यांनी सुनावणीसाठी बोलाविले आहे.
कंपन्यांच्या विरोधात तक्रारींचा पूर
निवडणुकीच्या काळात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टीने मोठय़ा तंत्रज्ञान कंपन्यांच्या विरोधात तक्रारींचा वर्षाव केला आहे. तंत्रज्ञान कंपन्यांकडून जाणूनबुजून रुढिवादी, धार्मिक आणि गर्भपातविरोधी विचारांना दडपले जात असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टीकडून केला जातो. चालू महिन्यात फेसबुक आणि ट्विटरने परंपरावादाकडे झुकलेल्या न्यूयॉर्क पोस्टमधून अध्यक्षीय उमेदवार ज्यो बिडेन यांच्या विरोधातील राजकीय वृत्ताच्या प्रसाराला मर्यादित केल्यावर हे प्रकरण चिघळले आहे. बिडेन यांच्या विरोधातील वृत्त कुठल्याच अन्य प्रकाशकाने छापले नाही.
समाजमाध्यम दिग्गज चौकशीच्या कक्षेत
निवडणुकीविषयी चुकीची माहिती फैलावण्याच्या प्रयत्नांसाठी समाजमाध्यमांचे दिग्गजही चौकशीच्या कक्षेत आले आहेत. ट्विटर आणि फेसबुकने अध्यक्षांच्या मजकूरावर एक चुकीची माहिती अशी टिप्पणी जोडली आहे. मंगळवारपासून फेसबुकने कुठल्याही प्रकारची नवी राजकीय जाहिरात स्वीकारणे टाळले आहे. परंतु यापूर्वीच प्राप्त राजकीय जाहिराती पुढील मंगळवारपर्यंत प्रसारित होत राहतील.
गुगलकडूनही जाहिराती बंद
युटय़ूबची मालकी असलेल्या गुगलनेही राजकीय जाहिराती रोखण्याचे पाऊल उचलले आहे. ट्विटरने सर्व राजकीय जाहिरातींवर बंदी घातली आहे. कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या चौकशीसह खासदार ऑनलाईन भाषणासाठी प्रलंबित कायदेशीर सुरक्षेचीही पडताळणी करणार आहेत.