गोकुवेधचे सचिव रुपेश वेळीप : सात दिवसात बदली मागे न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा गोकुवेधचा इशारा
प्रतिनिधी / पणजी
गुळेली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या विरोधकांना बालवाडीत अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या लता गावकर या दिव्यांग आदिवासी महिलेच्या पतीने सहानभुती दाखविल्यामुळे त्यांची बदली करण्याचा आदेश जारी करणाऱया महिला व बाल कल्याण खात्याच्या संचालिका दिपाली नाईक यांची सोमवारी गावडा, कुणबी, वेळीप, धनगर (गाकुवेध) फेडरेशनच्या सदस्यांनी भेट घेऊन त्यांना यासदर्भात जाब विचारला. यावेळी फेडरेशनचे सचिव रुपेश वेळीप, समाजसेवक रामा काणकोणकर व इतर सदस्य उपस्थित होते.
लता गांवकर या दिव्यांग असून त्यांची बदली 70 कि.मी दूर केपे येथे करण्यात आली आहे. या सदर्भात आदिवासी आयोगात देखिल दिपाली नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. लता गांवकर यांच्या बदलीचे कारण विचारल्यास नाईक यांना कारण माहीत नसल्याचे सांगितले त्यामुळे राजकीय दबावात ही बदली करण्यात आल्याचे स्पष्ट आहे. असे रुपेश वेळीप यांनी पत्रकार ांना सांगितले.
केपे येथे बदली करण्यात आल्यामुळे लता गांवकर यांना अनेक त्रास सहन करावे लागणार आहे. दिवसाला 300 ते 400 रुपये कमविणाऱया लता गांवकर यांच्यावर हा अन्याय आहे. त्यामुळे येत्या 7 दिवसात बदलीचा आदेश मागे न घेण्यात आल्यास संचालकांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा यावेळी गोकुवेधतर्फे देण्यात आला.