दोघांकडून बेदम चोप; कुपवाडमध्ये खळबळ
कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमध्ये राहणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या मिरज तालुका प्रमुखास कारखान्यातून लोखंड चोरी करताना रंगेहाथ पकडले. यात त्याचा पाठलाग करून दोघांनी तालुका प्रमुखास काठी व स्टिकने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने या चर्चेंने कुपवाडमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी चोरी प्रकरणी संशयित गोरख हणमंत व्हनकडे (वय ४०,रा.हनुमाननगर, कुपवाड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गोरख हा एका राजकीय पक्षाचा मिरज तालुका प्रमुख आहे. दरम्यान, चोरी करताना सापडल्याने अज्ञातांनी केलेल्या मारहणीत जखमी झाल्याने गोरख व्हनकडे याच्यावर विश्रामबाग येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मारहाण केल्याप्रकरणी जखमी व्हनकडे यांच्या तक्रारीनुसार अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गोरख व्हनकडे याने कानडवाडी येथील एका ऑईल कारखान्याच्या उभारणीसाठी आणलेल्या लोखंडी साहित्याची चोरीचे उजेडात आले आहे. कारखाना मालक सुचंद ऊर्फ सिध्देश्वर तुकाराम पवार (रा.जुना कुपवाड रोड) यांनी गोरख विरोधात फिर्याद दिली आहे.