मंत्री सुदिन ढवळीकर यांचे उद्गार :बांदोडा येथे ग्रामस्थांतर्फे हृद्य सत्कार
वार्ताहर /मडकई
मगो पक्षाचे नेते म्हणून गेल्या पंचवीस वर्षांत राजकीय क्षेत्रात अनेक सुखदुःखे अनुभवली. सामाजीकतेचे भान व जाण ठेऊन कार्य करताना जनतेच्या मनात निरखून पाहिले. एकाच पक्षाच्या छताखाली निष्ठेने कार्यरत राहून पक्षाची नितीमुल्ये जोपासली. कार्यकर्त्यांशी हितगुज साधला. गावबंधू व जनतेच्या आशिर्वादामुळे प्राप्त झालेल्या अनुभवातून मतदार संघावर शब्दातून नव्हे कृतीतून विकासाचा नवा साज चढविणार आहे, असे उद्गार वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काढले.
नावतवाडा महालक्ष्मी, बांदोडा येथील नावतवाडा बाल मंडळ, बांदोडा नागरिक समीती व नावतकर समाज संस्था यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. नावतकर रंगमंचावर आयोजित केलेल्या या सोहळय़ाला बांदोडय़ाचे सरपंच सुखानंद गावडे, पंच सदस्य मनिषा कुर्पासकर, माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक व मगो युवा नेते मिथील ढवळीकर, ज्येष्ठ नागरिक सुर्यकांत नाईक, नावतकर समाज संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ नाईक, महालक्ष्मी बाल मंडळाचे अध्यक्ष दामोदर नाईक, बांदोडा नागरिक समीतीचे अध्यक्ष शुभम नाईक आदी व्यासपिठावर उपस्थीत होते.
सुखानंद गावडे यांनी सांगितले, पंचायत क्षेत्रातली कचऱयाची समस्या मंत्री सुदिन ढवळीकर व माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मिथील ढवळीकर यांच्या सहकार्यांने सोडवली जात आहे. इतर प्रकल्पांना ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास बांदोडा पंचायतीचा खऱया अर्थांने विकास होईल. त्यामुळे विकासाचे स्वप्न पाहणाऱया मंत्री ढवळीकरांनाही खरोखरच आनंद मिळेल.
मंत्री ढवळीकरांचा राजकीय प्रवास स्तुत्य– शशीकांत नाईक
गोमंतकाचे भाग्य विधाते व पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पावलांवर पाऊल ठेऊन मंत्री सुदिन ढवळीकर यांचा राजकीय क्षेत्रातील पाव शतकाचा प्रवास खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. सत्तेच्या हव्यासापोटी क्षणोक्षणी पक्षांतर करणाऱया नेतांनी मंत्री ढवळीकरांचा आदर्श घ्यावा. मगो पक्षावर निष्ठा ठेऊन सत्ता व विरोधीनेते म्हणून त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासला तोड नाही. सामाजीक, राजकीय, कला, क्रीडा व शिक्षण साहित्य अशा सर्वच क्षेत्रात योगदान दिल्यामुळे त्यांच्या सत्काराला मूर्त स्वरूप मिळत असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक तथा नाटय़कलाकार शशिकांत नाइं&क यांनी व्यक्त केली.
विकासाचा महामेरु बहुत जनासी आधारु – शाणू नाईक
मंत्री सुदिन ढवळीकरांचा सत्कार करणे म्हणजे सत्कार्य करणे. त्यांनी पंचवीस वर्षात राजकीय व सामाजीक क्षेत्रात उत्तुंग कार्य साधले आहे. विकासाचा महामेरु बहुत जनासी आधारु हेच बिरुद त्यांच्यासाठी योग्य आहे. मंत्री सुदिन ढवळीकर यांना पाहिल्यानंतर मगो पक्षाचे सर्वेसर्वा स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांची मूर्ती नजरे समोर येते. मडकई मतदारसंघाला यथायोग्य आकार देणाऱया ढवळीकरांना मतदारांच्या हृदयात कायम स्थान असेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक शाणू नाईक यांनी व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक दामोदर नाईक यांनी केले. सूत्रसंचालन इश्वर नाईक यांनी केले. शशिकांत नाईक व शाणू नाईक यांनी मंत्री सुदिन ढवळीकर यांना पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या.