डॉ. मधु घोडकिरकेर यांनी केले सावधान
प्रतिनिधी /मडगाव
कोरोना महामारीची दुसरी लाट ही भयानक होती. दुसऱया लाटेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांनी आपली जवळची माणसे गमावली. त्याची पुनरावृती होऊ नये याची जबाबदारी सर्वांनीच घेतली पाहिजे. आज गोव्यात तिसरी लाट आलेली आहे. असे खुद्द आरोग्य खात्याने म्हटलेले आहे. अशा पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षाच्या जाहीरसभांना जी हजारोंची उपस्थिती लावून शक्तीप्रदर्शन घडविले जाते त्यावर नियंत्रण यायला पाहिजे, असे स्पष्ट मत गोवा मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिसिनचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मधु घोडकिरेकर यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेत सर्वांनी प्रचंड अनुभव घेतलाय, या अनुभवातून बरेच काही शिकण्यासारखे होते. आत्ता गोव्यात तिसरी लाट आली असून अशा परिस्थिती लोकांचा मोठा जमाव गोळा करणे प्रचंड धोक्याचे बनलेले आहे. लोकांना एकत्र आणण्याचे टाळणे अत्यंत महत्वाचे बनलेले आहे. आज आपल्या हातात तंत्रज्ञान आहे. त्यांचा वापर करून सर्वांपर्यंत पोचणे शक्य आहे. विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाईन झालेले आहेत. विद्यार्थी जर शाळांनी न जाता शिकू शकतात तर लोकांनी एकत्र न येता, ऑनलाईनचा वापर करून सभांमध्ये सहभागी होता येते असे डॉ. घोडकिरेकर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सुरू करण्यात आलेल्या शवचिकित्सा विभागाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल डॉ. मधु घोडकिरेकर यांनी शवचिकित्सा विभागाची माहिती प्रसार माध्यमांना दिली. दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलचे उद्घाटन हेच कोविड हॉस्पिटल म्हणून झाले होते. त्याच पद्धतीने शवचिकित्सा विभागाचे उद्घाटन देखील कोविड मृतदेह जतन करण्यासाठीच झाले होते. त्यावेळी अन्य मृतदेह जतन करणे व शवचिकित्सा हॉस्पिसियो हॉस्पिटलात केली जात होती. त्यानंतर टप्प्या टप्प्याने नव्या जिल्हा इस्पितळात शवचिकित्सा सुरू झाल्याची माहिती डॉ. घोडकिरेकर यांनी दिली.
शवागार कर्मचाऱयांसमोर होते आव्हान
सुरुवातीला सरकारने मडगावचे ईएसआय हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित केल्यानंतर पहिल्या लाटेत मृतदेह ईएसआय हॉस्पिसिटलच्या शवागरात जतन केले जात होते. त्याची क्षमता 12 मृतदेह जतन करण्याची होती. ईएसआय हॉस्पिटलात शवागर व्यवस्था होती. परंतु ती कार्यरत नव्हती. ती पहिल्या लाटेत कार्यरत करण्यात आली. कोविडच्या पहिल्या दोन बळीवर अंत्यसंस्कार ईएसआय हॉस्पिटलच्या माध्यमांतून फोंडय़ात करण्यात आले. ईएसआय हॉस्पिटलात डॉ. आयरा व डॉ. विश्वजित फळदेसाई यांचे पूर्ण सहकार्य मिळाले. शवागरात काम करणे कर्मचाऱयांसाठी एक आव्हान होते. त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम आपण केल्याचे डॉ. घोडकिरेकर म्हणाले.
दुसऱया लाटेत शवागार विभागाची कसोटी
कोविडच्या दुसऱया लाटेत ऑक्टोबर महिन्यात नव्या जिल्हा हॉस्पिटलात शवागर कार्यरत करण्यात आले व जानेवारी 2021 मध्ये प्रत्यक्षात मृतदेह जतन करण्यास प्रारंभ झाला. एप्रिल महिन्यात दुसरी लाट गोव्यात आली. त्यावेळी शवचिकित्सा विभागावर कठीण प्रसंग आला होता. 90 दिवसात या नव्या शवागरात जवळपास 700 ते 800 मृतदेह जतन केल्याची माहिती देण्यात आली. मे महिन्याच्या 7, 8 व 10 रोजी दररोज किमान 40 मृतदेह जतन केले हा काळ केवळ कसोटीचा नव्हता तर भयानक होता. अशा परिस्थितीत देखील येथील कर्मचाऱयांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
दोन प्रकरणे कायम लक्षात राहणारी
कोविडचे मृतदेह हाताळणे एक आव्हान होतेच. त्यात एका प्रसंगात जवळपास दफन केलेला एक मृतदेह पुन्हा उरकून काढण्याची पाळी आली तर दुसरी घटना किंचित आनंद देणारी अशीच होती. त्यात मृतदेहाची अदलाबदल झाली व अंत्यविधी करणार त्याच क्षणी कळून चुकले की, मृतदेह संबंधित व्यक्तीचा नव्हता. अशावेळी तो मृतदेह परत शवागरात आणावा लागला व जी व्यक्ती मृत समजण्यात आली होती ती जीवंत होती व हॉस्पिटलात उपचार घेत होती. या दोन घटना कायम स्वरूपी स्मरणात राहणाऱया होत्या, असे डॉ. मधू घोडकिरेकर म्हणाले.
1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 मध्ये या शवागरात 1200 मृतदेह जतन करण्यात आले. त्यात 700 ते 800 मृतदेह हे कोविडचे होते. गेल्या वर्षभरात दक्षिण गोव्यातून एकही मृतदेह उत्तर गोव्यात जागेअभावी गेलेला नाही. मात्र, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी तातडीने शवचिकित्सा करायची असल्यास काही मृतदेह गोमेकॉत नेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मडगावच्या नव्या शवागराची क्षमता 72 मृतदेह जतन करण्याची असून कोविड विभाग हा पूर्णपणे वेगळा करण्यात आलेला आहे. दक्षिण गोव्यातील सर्व पोलीस स्थानकांना मृतदेह जतन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
कोविडच्या दुसऱया लाटेत जसे लोकांचे बळी गेले, त्याची पुनरावृती होऊ नये अशी सर्वांचीच इच्छा आहे व त्यासाठी सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे असे डॉ. मधु घोडकिरेकर शेवटी म्हणाले.