प्रतिनिधी /बेळगाव
भाजप बेळगाव महानगरचे माजी सरचिटणीस राजकुमार टोपण्णावर यांनी भाजपला रामराम केला आहे. शुक्रवारी बेंगळूर येथे त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाने त्यांच्यावर उत्तर कर्नाटकातील चार जिह्यांची जबाबदारी दिली आहे.
आपने त्यांच्यावर बेळगाव, विजापूर, बागलकोट, हुबळी-धारवाड या चार जिह्यांची जबाबदारी सोपविली आहे. चार जिह्यात पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे हात बळकट करण्यासाठी आपण आपमध्ये प्रवेश केल्याचे राजकुमार यांनी सांगितले.
यावेळी आपचे पृथ्वी रेड्डी यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उत्तर कर्नाटकातील सर्वसामान्यांसाठी काहीतरी चांगले करावे, या उद्देशाने आपण आपमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जनउपयोगी योजना केल्या आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत, असेही राजकुमार यांनी सांगितले.