8 कोटी 50 लाख रुपये खर्चाची जेटी : मच्छीमार-पर्यटन व्यावसायिकांसाठी ठरणार होती फायद्याची : दोन वर्षांपूर्वी भूमिपूजन करण्याचे आमदारांनी केले होते जाहीर
मनोज चव्हाण / मालवण:
मालवण शहरातील मेढा राजकोट येथे केंद्र शासनाच्या नाबार्ड टप्पा नंबर 22 मधून उपलब्ध झालेल्या निधीतून उभारण्यात येणाऱया मत्स्य जेटीचा सुमारे 8 कोटी 50 लाख रुपयांचा ठेका निश्चित करण्यात आला आहे. महिन्याभरात जेटीच्या कामाचा शुभारंभ तत्कालीन मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी ऑगस्ट 2018 मध्ये पत्रकार परिषदेत दिली होती. त्यावेळी राज्यातील सात जेटींच्या कामांना शासनाने मान्यता दिली असून मुंबईतील शहापोरोजी पालनजी ऍण्ड कंपनी प्रा. लि. ही कंपनी जेटींची उभारणी करणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अद्याप या जेटीच्या कामाचा शुभारंभही न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मालवणात मोठय़ा संख्येने येणाऱया पर्यटकांना आता मेढा परिसरातील मत्स्य जेटीचा आनंद लुटता येणार आहे. याठिकाणच्या मच्छीमारांनाही आपल्या बोटी सुरक्षित ठेवण्यासाठी फायदा होणार आहे. मेढा येथे मत्स्य जेटी अस्तित्वात होती. त्यामुळे या कामाला सीआरझेडच्या अडचणी आल्या नाहीत, असेही नाईक यांनी स्पष्ट केले होते. मात्र, दोन वर्षांत या जेटीच्या कामाला सुरुवात झाल्याचे दिसत नाही. यामुळे नेमकी ही जेटी कधी उभारणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन वर्षे उलटली
दोन वर्षांपूर्वी आमदार वैभव नाईक यांनी राजकोट जेटीच्या कामाला मान्यता मिळाली असून लवकरच कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे, असे जाहीर केले होते. मात्र, याठिकाणी अद्याप कामाला सुरुवात न केल्याने राजकोट येथील जेटी होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजकोट येथे धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात आलेला आहे. हे काम तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. त्यामुळे आमदार नाईक यांनी राजकोट येथे जेटीची उभारणी करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार शासनाकडून मान्यताही आली होती. मात्र, दोन वर्षे उलटूनही हे काम सुरू न झाल्याने निधीच्या अडचणीतून काम रखडल्याची चर्चा किनारपट्टीवर सुरू झाली आहे.
मेढा राजकोट मत्स्य जेटीचे अंतरंग
जेटीचे बांधकाम 130 बाय 45 मीटर – 7 कोटी 14 लाख
पाणी वितरण व्यवस्था – 35 लाख
मार्गदर्शक स्तंभ – 7 लाख
सौरऊर्जा दिवे – 33 लाख
इतर साहित्य – 65 लाख