मगो पक्षाकडून ही निषेध
प्रतिनिधी /मडगाव
कोविड महामारीत संकटात सापडलेल्या कलाकारांना मदत करण्याच्या भाजप सरकारच्या नाकर्तेपणावर टीका केल्यानंतर गोव्याचे नामवंत कलाकार व नट राजदीप नाईक यांच्या गाडीवर झालेला हल्ला म्हणजे लोकांचा आवाज दाबण्यासाठी गोव्यात लादलेल्या अघोषीत आणीबाणीचे प्रतिबींब आहे असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे.
राजदीप नाईकांच्या गाडीवर हल्ला करुन मोडतोड करण्याच्या घटनेचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो. मुख्यमंत्री आणि कला व संस्कृतीमंत्र्यांनी ताबडतोब कृती करुन कलाकारांना योग्य मदत जाहीर करावी व दिलासा द्यावा अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.
गेल्यावर्षा पासून आपण सरकारकडे अर्थव्यवस्था चालीस लावण्यासाठी 100 कोटीचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी करीत आहे. सरकारने माझे म्हणणे ऐकले असते तर आज कलाकारांसह अनेक व्यावसायिकांना दिलासा मिळाला असता असा दावा दिगंबर कामत यांनी केला आहे.
मगो पक्षाकडून निषेध
राजदीप नाईक यांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या घटनेचा मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी तीव्र निषेध केला आहे. राजदीप नाईक हे स्पष्ट वक्ते आहेत व स्पष्ट बोलले ज्याच्या पचनी पडत नाही अशा व्यक्तीकडूनच अशा घडवून आणल्या जात असल्याचे दीपक ढवळीकर यांनी म्हटले आहे.
मगो पक्षाचे आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी गेल्या वर्षापासून कोरोना महामारीच्या काळात पारंपारीक व्यवसाय करणाऱयांना सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी करत आलेले आहेत. गोव्यातील कलाकारांना देखील मदत करावी अशी त्यांनी सातत्याने सरकारकडे मागणी केलेली आहे. पण, सरकारकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळा नाही. आत्ता सुद्धा मदत देण्याची घोषणा केली आहे, ती मदत पहाता कलाकारांवर हा अन्याय आहे. गोव्यातील अनेक कलाकार हे कलेच्या माध्यमांवरच आपली उपजीविका चालवित होते, त्यांच्यावर बिकट परिस्थिती आली आहे. त्याच्या भावनाच राजदीप नाईकने व्यक्त केल्याचे दीपक ढवळीकर म्हणाले.
राजदीप नाईक यांनी गाडीवर करण्यात आलेल्या हल्ल्याची पोलीस तक्रार नोंद करावी व ज्याने हे कृत केले असेल त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे श्र. ढवळीकर म्हणाले.
दरम्यान, सोशल मीडियावर देखील राजदीप नाईक यांच्या गाडीवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे. अनेक कलाकारांनी तसेच कला प्रेमींनी राजदीप नाईक यांना पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.