स्मार्ट सिटींतर्गत 3500 एलईडी खांबांचा प्रकल्प : वीज खात्याकडून 44 कोटींचा प्रस्ताव
प्रतिनिधी /पणजी
स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत राजधानीतील सुमारे 3500 विजेचे खांब ऊर्जा कार्यक्षम एलईडी बल्बसह नवीन स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग खांबांनी बदलले जातील.
शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलॉपमेंटतर्फे दयानंद बांदोडकर मार्गालगत बसवलेले खांब वगळता पणजी महानगरपालिका हद्दीतील सर्व विजेचे खांब बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
तब्बल 44 कोटींचा प्रस्ताव
यासंदर्भात वीज खात्याने यापूर्वीच सुमारे 44 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता आणि त्याला तांत्रिक मान्यता देखील दिली होती. तो प्रस्ताव आता स्मार्ट सिटीकडून हिरवा सिग्नल मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहेत, अशी माहिती स्मार्ट सिटीतील सुत्रांनी दिली आहे.
वेगवेगळय़ा उंचीचे असणार खांब
या सर्व खांबांमध्ये सेन्सरसारखे अद्ययावत घटक, वैशिष्टय़े असतील. त्यावर ऊर्जा कार्यक्षम एलईडी बल्ब बसविण्यात येणार आहेत. सेन्सरमुळे या स्मार्ट स्ट्रीट लाइटस् स्वयंचलित असतील. हे एलईडी बल्ब दिवसा आणि रात्रीच्या वेळेनुसार प्रोग्रामिंग करण्यात येतील. त्यामुळे स्वयंचलितरित्या ते चालू आणि बंद होतील. खांब वेगवेगळय़ा आकाराचे म्हणजे चार, सहा आणि आठ मीटर उंचीचे असतील.
सुमारे 15 वर्षांपूर्वी दयानंद बांदोडकर मार्गावर अंदाजे 350 कास्टिंग पोल बसवण्यात आले होते. त्यातील निम्म्यापेक्षा जास्त खांब निकामी झाले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत ते खांब बदलण्यात येतील. तसेच उर्वरित खांबावरील फिक्स्चर्स बदलण्यात येतील, अशी माहिती सुत्रांनी दिली.