खासदार उदयनराजेंच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन,
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनामुळे गतवर्षीप्रमाणे याही वर्षी खासदार उदयनराजे यांनी दसऱयाचा सण हा साधेपणाने साजरा करण्याचे अगोदरच जाहीर केले होते. त्यानुसार दसऱयाच्या दिवशी राजधानी साताऱयात पारंपारिक पध्दतीने पण साधेपणाने सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. श्री. छ. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांना दसऱयाच्या शुभेच्छा देत जलमंदिर येथे मानाच्या भवानी तलवारीचे पूजन विधिवत पद्धतीने केले. शिवतीर्थावर सोने लुटण्याचा कार्यक्रम करत सिमोल्लंघन करण्यात आले.
यावर्षी कोरोनामुळे साताऱयाचा दसरा हा मोठय़ा प्रमाणात साजरा न करता साधेपणाने करण्यात येणार असल्याची माहिती अगोदरच खासदार उदयनराजेंनी दिली होती. कोरोनाचे सर्व नियम पाळून दसऱयाच्या शुभेच्छा दिल्या जातील असेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार दसऱयाच्या दिवशी साताऱयात दिवसभर एकमेकांना सातारकर आपटय़ाची पाने एकमेकांना देवून शुभेच्छा देत होते. तर प्रत्येक जण आपल्या घराला फुलांची आरास करुन सजवत होता. सायंकाळी घरोघरी सातारकरांनी शस्त्रपूजन केले.
साताऱयाच्या शाही दसऱयाची महाराष्ट्रात मोठी शान आहे. साताऱयाच्या राजघराण्यातील मंडळी पोवई नाक्यावर येऊन सीमोल्लंघन करत सोने लुटतात अशी परंपरा आहे. या पारंपारिक सोहळ्याचा सातारकरांना अनुभव आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी भवानी मातेची व भवानी तलवारीचे पूजन केले. यावेळी जलमंदिरवर राजघराण्यातील निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या विधिवत पूजनानंतर उदयनराजे यांनी कोरोनाचे विघ्न हटू दे आणि ऐश्वर्य आणि समृद्धी सर्वत्र नांदू दे, असे साकडे भवानी मातेला घालत सर्व सातारकरांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. साताऱयाची भरभराट आणि समृध्दता हेच आपले उद्दिष्ट असल्याचे उदयनराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यानंतर उदयनराजे यांनी शिवतीर्थावर येऊन सीमोल्लंघन केले. येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यावेळी सातारकरांनी एकमेकांना आपटय़ाची पाने देत सोने लुटण्याचा आनंद घेतला.
किल्ले अजिंक्यताऱयाचे गडपूजन
साताऱयातील शिवभक्तांनी दसऱयाच्या निमित्ताने राजधानी किल्ले अजिंक्यताऱयावर जावून गडपूजन केले. राजसदरेला नमन केले. शिवभक्तांनी ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र म्हणून गडपूजन मोठय़ा भक्तीभावाने पार पडले.
तक्ताच्या वाडय़ामध्येही शस्त्रपूजन
मनसेचे युवराज पवार यांच्या पुढाकाराने तक्ताच्या वाडय़ामध्येही शस्त्रपूजन खासदार उदयनराजेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते. शिवभक्तांनी हजेरी लावली होती.