वातावरण झाले शिवमय : घरा-घरात शिवरांयाची पूजा, पारंपारिक पोषाख घालून तरूणाई सज्ज दुचाकीला झेंडा लावून जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणा
प्रतिनिधी / सातारा
डोक्यावर भगवा फेटा बांधून, पारंपारिक वेशभूषा अन् हातात भगवा झेंडा घेवून आज शुक्रवार दि. 19 रोजी शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवभक्त सज्ज झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक, जल्लोष न करता अत्यंत साधेपणाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे.
शिवजयंतीनिमित्त सातारा-कोरेगाव महामार्गावर बॉबे रेस्टॉरंट चौक, राजवाडा परिसर अशा विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती, प्रतिमा गेल्या आठ दिवसापासून विक्रीसाठी ठेवल्या आहेत. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती. आज दि. 19 रोजी शिवजयंतीनिमित्त सकाळपासून शहरातील चौकात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा, मूर्ती ठेवून पूजन करण्यात येत आहे. पोवाडे, गाणी लावल्याने संपूर्ण वातावरण शिवमय झाले आहे.
किल्ले अजिंक्यतारा येथे शिवज्योत घेवून पहाटे तरूण-तरूणी पोहचले आहेत. ‘जय जिजाऊ जय शिवराय’ अशा घोषणांनी किल्ले अजिंक्यतारा परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भगवे फेटे बांधून, दुचाकीला भगवे झेडे लावून शहरातून प्रवास सुरू आहे. यावेळी शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देण्यात येत आहेत. यंदा मिरवणूक काढण्यास परवानगी नसल्याने शांततेत जयंती साजरी होत आहे.
राजगड ते किल्ले अजिंक्तारा
साताऱयातील डॉ. शुभांगी गायकवाड या नवारी साडी घालून गुरूवारी मशाल घेवून राजगडावरून जोशीविहीर पर्यंत धावल्या. 12 तासात त्यांनी 74 किलोमीटर अंतर पार केले. त्या ऐशिया बुक ऑफ रेकॉर्ड करत आहेत. राजगड ते किल्ले अजिंक्यतारा असे 111 किलोमीटर चे अंतर त्या पार करणार आहेत. पुढचा प्रवासही आज किंल्ले अजिंक्यतारा येथे धावत येवून त्या पूर्ण करणार आहेत.
झेंडे, मूर्ती यांच्या किंमती…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लहान, मध्यम, व मोठय़ा आकाराच्या मुर्तींची किंमत 150 ते 600-800 रूपये इतकी आहे. दुचाकीच्या हॉन्डलला लावणारे झेंडे 50 रूपयांपासून 80, 120, 150 असे आहेत. सर्वात मोठे दांडीचे झेंडे 200 ते 290 रूपये असे किंमतीत आहेत.