प्रतिनिधी / सातारा :
एकीकडे कराड तालुका संवेदनशील होवू लागल्याने प्रशासनाने कराड शहरासह हॉटस्पॉट लॉकडाऊन करुन तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. तीन कोरोनामुक्तांकडून दिलासा मिळत असतानाच ग्रीन झोनमध्ये असलेल्या साताऱयात जिल्हा रुग्णालयातील एक महिला कर्मचारी बाधित आढळून आल्याने मग प्रशासनाने सातारा शहरासह सर्व उपनगरांमध्ये तातडीने 100 टक्के लॉकडाऊन बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला. पोलीस प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरातील गल्लीबोळासह नाकाबंदी केली असून शहरात प्रवेश करण्यासाठी फक्त दोनच मार्ग ठेवण्यात आले आहेत. गुरुवारी दिवसभर याचे चांगले पडसाद पहावयास मिळाले कारण सातारकरांनी लॉकडाऊनला प्रतिसाद देत घरात बसून राहणे पसंद केल्याने भविष्यातील धोके निश्चितपणे टळणार आहेत.
मार्च 23 रोजी एक कॅलिफोर्नियावरुन आलेली व्यक्ती कोरोना बाधित झाली होती. दुर्देवाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सातारा शहर व शहरानजिक उपनगरासह तालुक्यात कोणीही बाधित आढळून आला नव्हता. साताऱयाची वाटचाल ग्रीन झोनकडे सुरु असतानाच दि. 29 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातील एक टेक्निशियन सहाय्यक महिला कर्मचारी बाधित असल्याचा रिपोर्ट आला अन खळबळ उडाली. प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी तातडीने विविध विभागांची बैठक घेवून आढावा घेत उपाय योजना सुरु केल्या.
संबंधित महिला कर्मचारी सदरबझार परिसरातील ज्या अपार्टमेंटमध्ये रहात होती ती संपूर्ण अपार्टमेंट निर्जुंतकीकरण करण्यात आली तर तेथील रहिवाशांची तपासणी सुरु केली. महिलेच्या हाय रिस्क कॉटॅक्टमधील तिची मुलगी व आई यांची तपासणी करण्यात आली असून एक किलोमीटरचा परिसर बफर झोन घोषित करुन त्या परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने तातडीने सर्व्हे सुरु केला असून सर्व यंत्रणा गतीमान झाली आहे.
दरम्यान, रात्री उशिरा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा शहरासह उपनगर परिसरात 100 टक्के लॉकडाऊन जाहीर केला. यामध्ये दवाखाना, नर्सिंग होम या आरोग्य सुविधा व काही अत्यावश्यक बाबी वगळता सर्व व्यवहार 100 टक्के बंद करण्याचे आदेश दिल्याने गुरुवारी राजधानी ठप्प झाली होती. सातारकरांनाही परिस्थितीचे गांभीर्य कळल्याने लॉकडाऊनला 100 टक्के प्रतिसाद लाभल्याने दिवसभरात राजधानी चिडीचूप झाली होती.
शहर व परिसरात येण्यासाठी बाँबे रेस्टारंट व मोळाचा ओढामार्गे दोनच ठिकाणी प्रवेशद्वारे ठेवली असून सगळा शहर परिसर सीलबंद करण्यात आला आहे. शहरातील दोन मुख्य रस्तेही ठिकठिकाणी बॅरिकेटस लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून अत्यावश्यक रुग्णसेवा वगळता सर्व काही बंद असल्याने राजधानीत निरव शांतता नांदत होती.
एसपी तेजस्वी सातपुते यांच्याकडून पाहणी
बुधवारी रात्री उशिरा कोणत्याही सवलतीविना 100 टक्के लॉकडाऊनची ऑर्डर निघाली ती पुढील आदेश येईपर्यंत अनिश्चित काळासाठी आहे. या दरम्यान सातारा शहर व परिसरात पोलीस दलाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्यामुळे विनाकारण फिरणारांना चांगला चाप बसला आहे. दुपारी जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी प्रत्येक फिल्डवर उतरुन शहर परिसरासह उपनगरात पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. 100 टक्के लॉकडाऊन असल्याने आता नागरिकांनी अत्यावश्यक कारण सोडल्यास घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.