लँडिंगच्या ८ मिनीट आधी हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला
दिल्ली/प्रतिनिधी
देशाचे पहिले सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं बुधवारी तामिळनाडूच्या कुन्नूर परिसरात हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झालं. या हेलिकॉप्टर मध्ये एकूण १४ जण होते. या अपघातात बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण १३ जणांचं दुर्दैवी निधन झालं असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताविषयी आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत निवेदन दिलं. यावेळी राजनाथ सिंह यांनी अवघ्या २० मिनिटांत हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि अपघात झाला असं म्हंटलं आहे. तसेच त्यांनी संसदेत नेमकं अपघातावेळी काय घडलं, याविषयी देखील लोकसभेत सविस्तर माहिती दिली.
राजनाथ सिंह यांनी लोकसभेत हेलिकॉप्टर दुर्घटनेचा घटनाक्रम सांगताना, दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचा उड्डाण कालावधी अवघा २७ मिनिटांचा होता. ११ वाजून ४८ मिनिटांनी हेलिकॉप्टरनं एअरबेसवरून उड्डाण घेतलं. हे हेलिकॉप्टर १२ वाजून १५ मिनिटांनी वेलिंग्टन येथे पोहोचणार होतं. पण सुलुल एअरबेसचा १२ वाजून ८ मिनिटांनी अर्थात उड्डाण घेतल्यानंतर लँडिंगच्या ८ मिनीट आधी हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.