वृत्तसंस्था / कोलंबो:
श्रीलंकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणीच्या प्रारंभिक टप्प्यात पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीला (एसएलपीपी) बहुमत मिळत असल्याचे दिसून आले आहे. सिंहलीबहुल दक्षिण क्षेत्रातील 5 मतदारसंघांचे निकाल घोषित करण्यात आले आहे. तेथे एसएलपीपीला 60 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत.
सजीथ प्रेमदासा यांनी युनायटेड नॅशनल पार्टीमधून (यूएनपी) बाहेर पडत नवा पक्ष स्थापन केला अहे. प्रेमदासा यांचा पक्ष दुसऱया स्थानावर आहे. तर निवडणुक निकालानुसार युएनपी चौथ्या स्थानावर आहे.
मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुनाने (जेव्हीपी) युएनपीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. तमिळबहुल उत्तर क्षेत्रात मुख्य तमिळ पक्षाला जाफना येथील एका मतदारसंघात विजय मिळाला आहे. तर ईलम पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीने (ईपीडीपी) जाफना जिल्हय़ाच्या अन्य एका क्षेत्रात तमिळ नॅशनल अलायन्सला पराभूत केले आहे.
श्रीलंकेत सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले होते. तर मतमोजणीला गुरुवारी प्रारंभ झाला. पक्ष नवे सरकार स्थापन करण्यासाठी तयार असल्याचे उद्गार एसएलपीपीचे संस्थापक बेसिल राजपक्षे यांनी म्हटले आहे. विश्लेषकांनुसार एसएलपीपी 225 सदस्यीय संसदेत सहजपणे बहुमत प्राप्त करणार आहे.