निवड श्रेणीत ’पॉप्युलर चॉईस’ पुरस्कार ः उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात 2022 चा सर्वोत्तम राज्य चित्ररथ म्हणून उत्तर प्रदेशची निवड झाली. तर ‘पॉप्युलर चॉईस’ (लोकप्रिय) प्रकारात महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल ठरला आहे. राज्याच्या जैवविविधतेचे दर्शन घडविणारा ‘जैवविविधता मानके’ असा विषय महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथावर साकारण्यात आला होता. दरम्यान, ‘सीआयएसएफ’ची सर्वोत्तम मार्चिंग तुकडी म्हणून निवडण्यात आले अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी दिली आहे.
प्रजासत्ताक दिन संचलन 2022 मधील सर्वोत्कृष्ट चित्ररथ आणि सर्वोत्कृष्ट संचलन तुकडी यासाठीचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट चित्ररथ ठरला आहे. या चित्ररथामध्ये वाराणसी काशी विश्वनाथ धामचा देखावा साकारण्यात आला होता. तर महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक लोकप्रिय विभागातून बक्षीस मिळाले आहे. ऑनलाईन मतदानात सर्वाधिक लोकांनी महाराष्ट्राला पसंती दिली आहे. यंदा संचलनात जवळपास राज्यांचे 12 आणि मंत्रालयांचे 9 असे मिळून एकंदर 21 चित्ररथ सहभागी झाले होते.
सातऱयातील ‘कास’ पठाराचे नावलौकिक वाढणार
यंदा महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथात साताऱयातील ‘कास’ पठार दाखवण्यात आले होते. या चित्ररथाला ‘पॉप्युलर चॉईस’ प्रकारात बक्षीस मिळाल्यानंतर देशभरातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मिनल जोगळेकर यांची असून प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी आवाज दिला होता. महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून राजपथावर उपस्थितांनी राज्याचा समृद्ध जैवविविधता वारसाच अनुभवला होता. साहजिकच पर्यटनदृष्टय़ा पूर्वीपासूनच समृद्ध असलेल्या कास पठाराचे नावलौकिक देशात आणखी वाढणार आहे.
सेवा दलांमधून ‘नौदल’ सर्वोत्तम
भारतीय नौदलाच्या चित्ररथाला सर्व सेवा दलांमधील सर्वोत्तम चित्ररथाचा मान मिळाला. तर याच गटामधील सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ म्हणून हवाई दलाच्या चित्ररथाला गौरवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रालये/विभागांच्या श्रेणीमध्ये शिक्षण मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा चित्ररथ संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालय आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या चित्ररथाची संकल्पना ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ होती, तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा चित्ररथ ‘उडे देश का आम नागरिक’ या संकल्पनेवर आधारित होता.