काणकोण दौऱयात राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे उद्गार : राज्यपालांची काणकोण तालुक्याला चौथ्यांदा भेट
प्रतिनिधी /काणकोण
लोकशाहीत जनता सर्वोच्च असून मानवसेवा हाच धर्म मानून राजभवन देखील जनताभिमुख बनविण्याचा आपला प्रयत्न आहे. गोवा ही पृथ्वीतलावरील सुंदर अशी देणगी असून या राज्यातील मंदिरे, चर्च, आणि मशिदी देखील उत्कृष्ट बनावटीच्या आहेत, सांस्कृतिक परंपरेच्या देणग्या आहेत, असे सांगून गोवा स्वयंपूर्ण यात्रेच्या अंतर्गत संपूर्ण गोव्यातील अडल्या-नडलेल्यांना मदत करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी श्रीस्थळच्या पंचायत सभागृहात काणकोणच्या पंचायत सदस्यांशी वार्तालाप केल्यानंतर सांगितले.
राज्यपाल पिल्लई यांची काणकोण तालुक्यातील ही चौथी भेट असून यापुढे देखील आपण या तालुक्यास वारंवार भेट देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिनी आपण गोव्यातील 71 मूत्रपिंड रुग्णांना आणि 71 शैक्षणिक संस्थांना आर्थिक मदत करण्याचा संकल्प सोडला होता. मात्र आतापर्यंत 200 मूत्रपिंड रुग्ण व 100 शैक्षणिक संस्थांना राजभवनच्या माध्यमातून आार्थिक साहाय्य करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. शहरांप्रमाणेच गावांचा देखील विकास व्हायला हवा. पर्यावरणाचे संतुलन सांभाळून त्या विकासाकडे पाहिले पाहेजे. त्यासाठी वृक्ष लागवड करा, असा सल्ला त्यांनी दिला.
या समारंभाच्या व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर, राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक, काणकोणचे उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई, मामलेदार मनोज कोरगावकर, गटविकास अधिकारी अनिल नाईक, खोलचे जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, खोलच्या सरपंच पूर्णा नायक, आगोंदचे सरपंच बादल ना. गावकर, श्रीस्थळचे सरपंच रामू नाईक उपस्थित होते.
खोल पंचायतीमध्ये कनेक्टीविटीचा अभाव
यावेळी काणकोण तालुक्यातींल पंच-सरपंचांनी आपापल्या पंचायतमधील अनेक समस्या राज्यपालांसमोर मांडल्या. खोल पंचायतीमध्ये नेटवर्कची मोठी समस्या आहे. रस्त्यांची बिकट अवस्था झालेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. विकासकामे अडकली आहेत, अशा कैफियती सरपंच पूर्णा नायक यांनी मांडल्या. तर श्रीस्थळचे सरपंच रामू नाईक, माजी उपसरपंच संजू नाईक, पंच राजेश वेळीप, आगोंदचे सरपंच बादल ना. गावकर यांनी लेखी निवेदने सादर केली.
पंधरा मूत्रपिंड रुग्णांना अर्थसाहाय्य
काणकोण तालुक्यात मूत्रपिंडाच्या रुग्णांची संख्या खूप असून त्यातील बरेच जण काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत. यावेळी या तालुक्यातील एकूण 15 अशा रुग्णांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत राज्यपालांकडून करण्यात आली. त्यात रक्षता विनय पागी, सत्यवान पागी, सूचना वेळीप, यशोदा वेळीप, संतोष रामचंद्र गायक, कृतिका पागी, रेजिनाल्डो डिसोझा, लक्मू के. पागी, सूर्याजी पागी, डेल्फिना मास्कारेन्हस, सरिता पागी, कोस्तांसियो बार्रेटो, खुशाली पागी, नीलिमा पागी व समिधा पागी यांना धनादेश वितरित करण्यात आले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात स्थिर आणि सक्षम सरकार सध्या काम करत असून गोव्यातील जनतेला सशक्त, बलवान आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सभापती तवडकर यांनी यावेळी बोलताना केले आणि राज्यपालांच्या कार्याचे कौतुक केले.
काणकोण बालभवनमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि स्वागतगीत सादर केल्यानतंर सरपंच रामू नाईक यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीस्थळचे माजी सरपंच दत्ता गावकर यांनी केले. देवेंद्र नाईक, राजेश वेळीप, विद्या गायक यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. गणेश वेळीप यांनी आभार मानले. सरपंच रामू नाईक यांनी राज्यपालांना स्मृतिचिन्ह भेट दिले.
गोव्यातील मंदिरांवर पुस्तिका लिहिणार
त्यापूर्वी राज्यपालांनी सपत्नीक श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवालयाला भेट दिली. यावेळी देवस्थानचे नव्नीन अध्यक्ष विठोबा देसाई, मावळत्या समितीचे अध्यक्ष राजेंद्र वेळीप, जयेश गावकर, अन्य समिती सदस्यांनी स्वागत करून पारंपरिक समई भेट देऊन त्यांचा गौरव केला. येणाऱया काळात गोव्यातील सर्व मंदिरांना भेट देऊन या मंदिरांवर राजभवनतर्फे माहिती पुस्तिका लिहिण्याचा मनोदय राज्यपालांनी पैंगीणच्या श्री परशुराम मंदिराला भेट दिल्यानंतर बोलताना व्यक्त केला.
श्री परशुराम मंदिराजवळ पैंगीण परशुराम पंचैग्राम देवस्थान समितीचे अध्यक्ष उदय प्रभुगावकर, मावळते अध्यक्ष दामोदर फळगावकर, देवस्थानचे पुजारी निशाकांत टेंगसे, रामदास पुजारी आणि अन्य सदस्यांनी राज्यपाल पिल्लई आणि सभापती तवडकर यांचे स्वागत केले आणि देवस्थानच्या वतीने स्मृतिचिन्ह भेट दिले. राज्यपालांच्या पत्नी ऍड. रिटा श्रीधरन यांची तेजा उदय प्रभुगावकर यांनी खणा-नारळाने ओटी भरली. उदय प्रभुगावकर, ज्ञानानंद प्रभुगावकर यांनी श्री परशुराम देवस्थानच्या इतिहासाची माहिती राज्यपालांना दिली.
पैंगीण पंचायतीतर्फे राज्यपालांचा गौरव
त्यापूर्वी राज्यपालांनी पैंगीणच्या वनविश्रामधामाजवळ आयोजित विशेष बैठकीत पैंगीण, लोलये, खोतीगाव आणि गावडोंगरीच्या पंचायत सदस्यांशी संवाद साधला. लोलयेचे सरपंच सचिन नाईक, भूषण प्रभुगावकर, अजय लोलयेकर, सचिव संदीप देसाई, पैंगीणच्या उपसरपंच एल्डा फर्नांडिस, दीक्षा पागी, विपीन प्रभुगावकर, प्रवीर भंडारी, रूदेश नमशीकर, सचिव राजीव ना. गावकर, खोतीगावचे सरपंच दया गावकर, उपसरपंच भाविका गावकर, पायक वेळीप आणि अन्य पंच, सचिव सुशांत ना. गावकर, गावडोंगरीच्या सरपंच अंजली वेळीप, प्रभाकर गावकर, पैंगीणच्या जिल्हा पंचायत सदस्या शोभना वेळीप यांनी पिण्याच्या पाण्याची समस्या, कनेक्टिव्हिटी आणि बेरोजगारीसारखे विषय राज्यपालांसमोर मांडले. पैंगीण पंचायतीतर्फे यावेळी पारंपरिक दिवज, तर पैंगीण जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या वतीने सुभाष महाले यांनी राज्यपालांना सर्पकाठी भेट दिली.
…. ऑक्ट्रॉय मिळत नसल्याची कैफियत
ज्यावेळी जीएसटी लागू झाला त्या वेळेपासून लोलये पंचायतीचा हक्क असलेला ऑक्ट्रॉय सरकारने बंद केलेला आहे. या पंचायतीमध्ये तीन पेट्रोल पंप असून वर्षाकाठी 60 ते 70 लाख रु. इतका ऑक्ट्रॉय पंचायतीला मिळत होता. ऑक्ट्रॉय देणे बंद झाल्यामुळे पंचायतीच्या विकासकामांवर परिणाम झालेला आहे, अशी कैफियत लोलयेच्या पंचायत सदस्यांनी राज्यपालांसमोर मांडली. राज्यपालांचा संपूर्ण दिवसांचा दौरा यशस्वी करण्यासाठी काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रभुदेसाई, मामलेदार कोरगावकर, गटविकास अधिकारी नाईक तसेच गटविकास अधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि मालेदार कार्यालयांतील कर्मचाऱयांनी विशेष मेहनत घेतली.