सिरामध्ये 82.31 टक्के मतदान तर राजराजेश्वरीनगरमध्ये केवळ 45.24 टक्के
प्रतिनिधी/ बेंगळूर
तिन्ही राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची असलेल्या राज्यातील राजराजेश्वरीनगर आणि सिरा मतदारसंघात मंगळवारी शांततेत मतदान झाले. तुमकूर जिल्हय़ातील सिरा मतदारसंघात मतदारांनी उत्स्फूर्त दिला असून 82.31 टक्के मतदान झाले. तर राजराजेश्वरीनगरमध्ये मतदार मतदान केंद्रांकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे येथे केवळ 45.24 टक्के मतदान झाले. दोन्ही मतदारसंघातील एकूण 31 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. 10 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्वांचे पोटनिवडणूक निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.
कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत देखील राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा झाली होती. मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान झाले. निजद आमदार सत्यनारायण यांच्या अकाली निधनामुळे सिरा मतदारसंघात तर मुनिरत्न यांनी आमदारपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राजराजेश्वरीनगरमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली आहे. राजराजेश्वरीनगरमधून भाजपचे मुनिरत्न, काँग्रेसच्या कुसुमा, निजदच्या व्ही. कृष्णमूर्ती यांच्यासह एकूण 16 उमेदवारांचे राजकीय भवितव्य 10 ऑक्टोबर रोजी अधोरेखित होणार आहे. तर सिरा मतदारसंघातील भाजपचे डॉ. राजेश गौडा, काँग्रेसचे टी. बी. जयचंद्र आणि निजदच्या अम्माजम्म यांच्यासह 15 उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या.
दोन्ही मतदारसंघांमध्ये सकाळी मतदान संथगतीने चालले. दुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढली. सिरा मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. तर राजराजेश्वरीनगरमध्ये मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. त्यामुळे बेंगळूरच्या इतिहासात राजराजेश्वरीनगरमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. बेंगळूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने येथील मतदारांमध्ये संसर्गाच्या भीतीमुळे मतदानाचा हक्क बजावण्यात उत्साह दिसून आला नाही.
सिरा मतदारसंघात सकाळी 9 पर्यंत 8.25 टक्के मतदान झाले. तर राजराजेश्वरीनगरमध्ये याच कालावधीत 6.27 टक्के मतदान झाले. 11 वाजता दोन्ही मतदारसंघांमध्ये अनुक्रमे 23.63 टक्के आणि 14.44 टक्के मतदानाची नोंद झाली. सायंकाळी 5 नंतर कोरोनाबाधित आणि कोरोनाच्या संशयित रुग्णांना मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती.