तपासणी केलेल्या विक्रेत्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह
प्रतिनिधी/ सातारा
आळुच्या खड्डयातून पुन्हा राजवाडा येथील गांधी मैदानावर सातारकर खवैय्यांची चौपाटी पुन्हा सुरू झाली आहे. सर्व विक्रेत्यांनी कोरोना टेस्ट ही केली असून ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्या विक्रेत्यांनी रिपोर्ट संघटनेकडे जमा करून व्यवसायाला सूरूवात केली आहे. मात्र कोरोनाची धास्ती कायम असल्याने ग्राहकांची संख्या वाढणार का ? यांची चिंता विक्रेत्यांना लागून राहिली आहे.
छ. उदयनराजे भोसले यांच्या आदेशानंतर आळुच्या खड्डयातून चौपाटी गांधी मैदान येथे सूरू झाली. या विक्रेत्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आल्याने सर्वच विक्रेत्यांनी कोरोना टेस्ट केली आहे. मात्र एकदम सर्वांचे रिपोर्ट आले नाहीत. ज्यांचे रिपोर्ट आलेत त्यांनी संघटनेकडे रिपोर्ट देवून मंगळवारपासून व्यवसायाला सुरूवात केली आहे. दिवसभर विक्रेत्यांच्या उत्साहाचे वातावरण दिसत होते. कोरोनाची धास्ती सोबत असतानाही पुन्हा रोजगार उपलब्ध होणार यांचे समाधान चेहऱयावर पहायला मिळत होते. सातारकर खवैय्यांची हक्काची चौपाटी असून गरजु ते सर्वसामान्य येथे वेगवेगळया पदार्थाचा आस्वाद घ्यायला यायचे. तेव्हा कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. आता कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. यामुळे पुन्हा ग्राहक तेवढयाच आवडीने आस्वाद घ्यायला येणार का ? असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. यामुळे ग्राहकांच्या संख्या वाढायला काही दिवसाचा अवधी लागणार आहे. तसेच प्रशासनाने घालुन दिलेले नियम पाळणार असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहेत.
आठवडय़ाला होणार चौपाटी स्वच्छ..
कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना चौपाटी सूरू करण्याची परवानगी पुन्हा मिळाली तरी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स या नियमांचे पालन करणे विक्रेत्यांवर बंधनकारक करण्यात आले आहेत. विक्रेत्यांनी जरी कोरोना टेस्ट केली तरी ग्राहकांनी कोरोना टेस्ट केलेली नाही. यामुळे सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या सुचना स्वतः च विक्रेते करणार आहेत. युज ऍन्ड थ्रो च्या डिश, ग्लास वापरण्यात येणार आहेत. आठवडय़ातून एकदा संपूर्ण गाडे हटवून चौपाटी स्वच्छ करण्यात येणार आहे.