प्रतिनिधी / सातारा :
ऐतिहासिक असे शिवसमर्थ शिल्प राजवाडा बसस्थानकात नगरसेवक विजय काटवटे यांनी मोठया प्रयत्नाने उभे केले. मात्र, डाव्या विचारांचे संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे, पार्थ पोळके यांनी पत्रकार परिषद घेवून प्रशासनाने शिल्प काढले नाही तर आम्ही तोडू असा इशारा दिला होता. त्यानुसार लगेच प्रशासनाच्यावतीने लगेच राजवाडा बसस्थानक बंद करुन कडक बंदोबस्त तेव्हापासून ठेवला आहे. शिवसमर्थ शिल्प झाकले गेले आहे.
साताऱ्यात किल्ले सज्जनगड येथे अनेक पर्यटक येत असतात. तेच पर्यटक राजवाडा बसस्थानकातून जातात. राजवाडा बसस्थानकात शिवसमर्थ शिल्प उभारण्याचे संकल्प नगरसेवक विजय काटवटे यांनी केला. त्यांनी तात्कालिन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन राजवाडा बसस्थानकाच्या सुशोभिकरणासाठी फंड आणला अन् त्यातून सर्व मंजूऱ्या घेवून ऐतिहासिक असे शिवसमर्थ शिल्प उभे केले. मात्र, या शिल्पाला काही संघटनांकडून विरोध झाला. तोही शिवसमर्थ शिल्प पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनावेळी. उद्घाटनाच्यावेळी नगरसेवक विजय काटवटे यांनी प्रशासनाकडे विनंती केल्याचे समजताच कथित डाव्या विचाराच्या संघटनांनी आक्षेप घेतल्याने हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने या शिल्पाचे लोकार्पण केले. त्यानंतर त्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करुन लगेच ते शिल्प झाकले. बसस्थानक बंद केले. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे, पार्थ पोळके यांनी पत्रकार परिषदेत भडक वक्तव्य करुन ते शिल्प हटवण्याबाबत इशारा दिला होता. त्या अनुषंगाने सातारा पोलिसांचा खडा पाहरा राजवाडा बसस्थानकात असून पुन्हा दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल वातावरण होवू नये याकरता दक्षता घेतली जात आहे.