73 वर्षीय ईश्वर सिंग यांनी मिळविले 84.6 टक्के गुण
जेजेपची गुहला येथील आमदार ईश्वर सिंग यांनी वयाच्या 73 व्या वर्षी 84.6 टक्के गुणांसह एमए राजशास्त्राच्या पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांनी मागील वर्षी घरातूनच ऑनलाईन परीक्षा दिली होती. आमदार तिसऱयांदा एमए करत आहेत. संधी मिळत राहिल्यास शिकण्याचे स्वतःचे प्रयत्न सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी त्यांनी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि इतिहासातही एमए केले आहे.
याचबरोबर एलएलबी आणि एलएलएम देखील त्यांनी केले आहे. या सर्व पदवी मिळविण्यापूर्वी ईश्वर सिंग 1977 मध्ये हरियाणा विधानसभेचे सदस्य झाले होते आणि त्यावेळी ते केवळ दहावी पास होते.
10 वी पास ईश्वर सिंग आमदार झाले, पण राजकीय उलथापालथ होत असताना त्याच कार्यकाळात त्यांना हरियाणा शालेय शिक्षण मंडळाचा अध्यक्ष होण्याची संधीही मिळाली. ही मोठी कामगिरी असली तरीही ईश्वर सिंग यांना राज्याच्या 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी धोरण तयार करण्याची जबाबदारी असताना आपण केवळ 10 वीपर्यंत शिकलो असल्याची बोच लागून राहिली होती. मंडळाच्या दुसऱया बैठकीतच त्यांनी पदाचा राजीनामा देत पुढील शिक्षण घेण्याचा निर्धार केला होता.